शांघाय सहकार संघटनेत भारत-पाक यांनाही सहभागी करा – रशिया

 बिजींग, दि. १२ – शांघाय सहकार संघटनेत (एस.सी.ओ.) भारत-पाकिस्तान या दोन देशांनाही सहभागी करुन घेण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी रशियाने केली आहे. 
    चीन, रशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि किरगिझिस्तान या देशांनी एकत्र येवून परस्पर सहकार्य आणि संरक्षणासाठी २००१ साली एस.सी.ओ ही संघटना उभारली होती. सध्या भारत, पाकिस्तान, इराण आणि मंगोलिया या राष्ट्रांना या संघटनेच्या बैठकांना निरीक्षक म्हणून उपस्थित राहता येते. बीजींगमध्ये एस.सी.ओ. देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीतील चर्चेत सहभागी होत, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेयी लावरोव्ह यांनी भारत-पाकिस्तान या दोन देशांना सदर संघटनेचे लवकरात लवकर सदस्य बनवावे अशी मागणी केली. याबाबतचा निर्णय घेण्यास उशीर झाल्यास त्याचा विपरित परिणाम होऊ शकेल असा इशाराही त्यांनी दिला.
    चीनच्या राजधानीमध्ये बैठक सुरु असलेल्या या संघटनेच्या अध्यक्षपदी चीन असून गेल्यावर्षी ऑगस्ट २०११ मध्ये चीनने संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. संघटनेचे अध्यक्षपद फिरते आहे. भारत-पाक आदी राष्ट्रांप्रमाणेच अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या राष्ट्रांना एस.सी.ओ ने निमंत्रित राष्ट्राचा दर्जा दिला आहे. येत्या १४ जून रोजी काबूलमध्ये अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर विचारविनिमय करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्याचेही लावरोव्ह यांनी यावेळी सांगितले.
    एस.सी.ओ. ने अफगाणिस्तानला निरीक्षक राष्ट्राचा दर्जा दिल्यास, अफगाणिस्तानचे राजकीय आणि आर्थिक पुनरुत्थान करण्याच्या योजनांना बळकटी मिळू शकेल असेही लावरोव्ह म्हणाले.

Leave a Comment