राजधानी एक्सप्रेसमधील अन्न खाल्ल्यामुळे प्रवाशांना विषबाधा

नवी दिल्ली, दि. १२ – नवी दिल्लीहून रांचीला जाणार्‍या रांची राजधानी एक्सप्रेसमधील अन्न खाल्ल्याने अनेक प्रवासी आजारी पडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वे केटरिंग सेवेचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. आजारी पडलेल्या प्रवाशांमध्ये झारखंडमधील पलामू पक्षाचे खासदार कामेश्‍वर बैठा यांचा समावेश आहे.
    रेल्वे कानपूररहून सुटल्यानंतर पॅन्ट्री कारच्या कर्मचार्‍यांनी प्रवाशांना जेवण देण्यास सुरूवात केली. हे अन्न खाल्ल्यावर प्रवाशांना पोटदुखी आणि उलटया होऊ लागल्या. परिणामी ट्रेनमधील प्रवाशांनी गोंधळ करण्यास सुरूवात केली. मुगलसराय स्थानकात ट्रेन पोहोचताच तेथील डॉक्टरांनी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून मगच ट्रेनच्या पुढच्या प्रवासाला अनुमती दिली.
    दरम्यान, पॅन्ट्री कारमध्ये बनलेल्या जेवणाचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळपणा केव्हा संपुष्टात येणार, केटरिंग सारखी महत्वाची व्यवस्था दलालांच्या विळख्यातून केव्हा मुक्त होणार असा सवाल प्रवासी संघटनांनी केला आहे. रेल्वे प्रशासन स्वतःची केटरिंग सेवा उभारण्याच्या प्रयत्नात असले, तरी ते कधी सुरू होईल हे सांगणे कठीण असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Leave a Comment