`ज्वालाग्रही पाकिस्तान’ या पुस्तकाचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते

पुणे, दि. १३ – द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला चिकटून राहण्याची पाकिस्तानची विचारसरणी हाच भारत-पाकिस्तान संबंध सुघारण्यातील मोठा अडसर असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर यांनी व्यक्त केले. केवळ धर्माच्या आधारे राष्ट्र उभे राहू शकत नाही याची प्रचिती पाकिस्तानकडे पाहिल्यावर येते, असेही ते म्हणाले.
    सरहद रिसर्च सेंटर फॉर कॉन्फ्लिक्ट रेझल्युशन अँड पीस आणि चिनार पब्लिशर्सतर्फे एम. जे. अकबर यांच्या रेखा देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या `ज्वालाग्रही पाकिस्तान’ या पुस्तकाचे प्रकाशन करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पाकिस्तानविषयक पुस्तकांच्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. संस्थेचे संजय नहार, प्रकल्प संपादक अरविंद व्यं. गोखले, उद्योजक आदित्यराज शहा, सरहद रिसर्च सेंटरचे अध्यक्ष भारत देसडला आणि डॉ. सतीश देसाई याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
एम. जे. अकबर म्हणाले, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता आणि देशाच्या विकासामध्ये गरीबांचाही हिस्सा आहे या चार सिद्धांतावर भारताची वाटचाल सुरू आहे. हिंदू आणि मुस्लीम असा भेद न करता मानवतेच्या भूमिकेतून पाहण्याची शिकवण देशाला प्रगतीपथावर नेत आहे. याउलट हिंदू आणि मुस्लीम एकत्र नांदू शकत नाहीत हीच पाकिस्तानची विचारसरणी आहे. पाकिस्तानपासून वेगळे झालेले बांगला देश धर्माधारित राष्ट्र राहिले नाही. त्यामुळे भारतातून बांगला देशामध्ये दर, अर्ध्या तासाला विमान जाते. तर, पाकिस्तानामध्ये दिवसभारतून केवळ चार विमानांचे उड्डाण होते. पाकिस्तानचा द्विराष्ट्रवाद हाच दोन देशांमधील संबंध सुधारण्यामध्ये अडसर ठरला आहे. केवळ धर्माच्या आधारे राष्ट्र उभे राहू शकत नाही याची प्रचिती पाकिस्तानकडे पाहिल्यावर येते.
    इंग्रजांच्या रावजवटीमध्ये भारत एकसंध झाला आणि प्रगती झाली हा गैरसमज आहे. त्याचप्रमाणे जीना यांनी पाकिस्तानची निर्मिती केली हादेखील चुकीचा समज आहे. फाळणीच्यावेळी पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू अल्पख्याकांची संख्या ४० टक्क्यांवरून आता केवळ दोन टक्के झाली आहे. पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांसाठी नाही तर, इस्लामसाठी झाली आहे.  स्वातंत्र्यापूर्वीच्या कॉंग्रेसचा एकही असा नेता नाही की जो तुरुंगात गेला नाही. याउलट मुस्लीम लीगचा एकही नेता तुरुंगात गेलेला नाही हे वास्तव आहे, याकडे एम. जे. अकबर यांनी लक्ष वेधले. काश्मीरला हिंदूंपासून तोडून स्वतंत्र करण्याचा विचार झाला तर माझा भारतावरील विश्‍वास संपुष्टात येईल, असेही अकबर म्हणाले.
    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केवळ काश्मीरमुळेच भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव आहे असे नाही. तर, पारंपरिक युद्ध करण्याची क्षमता नसल्यामुळे पाकिस्तान दहशतवादी हक्क करून भारतामध्ये अशांतता निर्माण करीत आहे. त्यामध्ये प्रचंड आर्थिक ताकद खर्ची पडते आणि मनुष्यबळदेखील गुंतून राहते. या कारवायांच्या माध्यमातून गुंतवणूकदार आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत अस्थिरता पसरवण्याचा पाकिस्तानचे धोरण आहे. अशा कारवाया होत राहणारच हे गृहित धरून केंद्र आणि राज्यसरकारने सतर्क राहण्याची तयारी ठेवावी लागेल. भारताकडून राजनैतिक संबंध सुधारण्यावर भर दिला जात आहे. लाहोर बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे माणसा-माणसांतील संवाद वाढत आहे. आता क्रिकेट सामनेदखील सुरू होत आहेत. त्यामुळे व्यापार आणि सांस्कृतिक व्यवहारातून फायदा होत असल्याचे पाकिस्तानच्याही ध्यानात येईल.
    अरविंद व्यं. गोखले यांनी पाकिस्तानविषयक पुस्तकांच्या प्रकल्पाची माहिती दिली. संजयनहार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment