अपघातग्रस्त विमानाची पाहणी करण्यासाठी रशियाचे पथक रवाना

जकार्ता दि.११- सुकोई सुपरजेट १०० या रशियन प्रवासी विमानाला झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी रशियन पथक इंडोनेशियाला रवाना झाले असून शुक्रवारी म्हणजे आजच ही पाहणी केली जाणार आहे. ४७ प्रवासी असलेले हे विमान बुधवारी जर्कातातील ज्वालामुखीच्या डोंगराजवळ कोसळून सर्व प्रवासी ठार झाले आहेत.
  रशियन दूतावासाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उद्योग मंत्रालयातील कांही अधिकारी, विमान प्राधिकरण समितीचे अधिकारी व सुखोई सिव्हील एअरक्रांफ्ट अधिकार्‍यांचा या पथकात समावेश आहे. शुक्रवारी पहाटेच सहा हेलिकॉप्टर या भागात मृतदेहांचे अवशेष आणण्यासाठी रवाना करण्यात आली असून दुपारी धुके असते त्यामुळे हे काम लगोलग हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सलक पर्वतावर ४५० किमीच्या वेगाने जाणारे हे विमान १८०० मीटर उंचीवर धडकले होते.
  दरम्यान या अपघाताबद्दल गुरूवारीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर चर्चा केली असून दोन्ही देशांनी या कामी एकत्रितपणे काम करण्याचे ठरविले असल्याचे इंडोनेशियाचे अध्यक्ष सुसिली बांबांग यांनी जाहीर केले आहे.

Leave a Comment