हवेवर चालणारी कार भारतात लवकरच

पुणे दि.१२- कॉम्प्रेस एअरवर चालणार्‍या दोन मोटारींच्या चाचण्या देशातील अग्रगण्य उद्योगसमूह टाटा मोटर्सने घेतल्या असल्याचे व लवकरच या गाड्यांच्या उत्पादनाचा प्रकल्प उभा करण्यात येणार असल्याचे समजते.
  भविष्यात इंधनाची उद्भवू शकणारी समस्या लक्षात घेऊन अन्य इंधनांवर चालू शकतील अशा गाड्या बनविण्यासाठी सर्व जगभर प्रयत्न केले जात आहेत. २००७ सालात टाटा मोटर्सनेही मोटर डेव्हलपमेंट इंटरनॅशनल या फ्रेंच डिझायनर कंपनीबरोबर हवेवर चालणार्‍या कारचे डिझाईन करण्याचा परवाना करार केला होता असेही समजते.
 कंपनीच्या वरीष्ठ वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार कॉम्प्रेस्ड एअर इंजिन ही कल्पना नवी नाही. शतकभरापूर्वीच या प्रकारचे मॉडेल इंजिन तयार केले गेले होते आणि खाण उद्योगात दशकानुदशके त्याचा वापरही केला गेला आहे. इलेक्ट्रीक मोटार येईपर्यंत याच इंजिनांचा वापर केला जात होताच पण आजही कॉम्प्रेस एअर पॉवर यंत्रे विशेषतः न्युमॅटिक यंत्रे वाहन उद्योगात वापरली जात आहेत. ही इंजिनेही पॉवर इंजिनांप्रमाणेच काम करतात फक्त येथे इंधनाऐवजी हवा वापरली जाते.
  स्वीडनच्या संशोधकांनी असे सिंगल सिलेंडर इंजिन तयार करून त्याच्या चाचण्या घेतल्या आहेत. यात मुख्य अडचण येते ती पॉवर कशी मिळवायची याचीच. एअर कॉम्प्रेसर इंजिनावर कार ताशी ३५ ते ४० मैल वेगाने धावू शकते मात्र त्यानंतर इंजिनाला बाहेरून जादा हवा घ्यावी लागते व त्यासाठी ऑन बोर्ड एअर कॉम्प्रेसर बसवावा लागतो .हा कॉम्प्रेसर इंधनावर चालणारा असेल तर प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. मात्र इतर वाहनांप्रमाणेच ही कार टाकीत एअर असेपर्यंत चालू शकते. कॉम्प्रेसर एअर साठवायची तर त्यासाठी पोलादापेक्षा भक्कम धातूची टाकी बनविणे गरजेचे आहे असे ही सांगण्यात आले. अर्थात पेट्रोल अथवा डिझेल, नैसर्गिक वायू व हैड्रोजनपेक्षा  या हवेच्या टाकीचा धोका निश्चितच कमी असतो असेही हे अधिकारी म्हणाले.

Leave a Comment