परकीय चलनसाठ्याचा अतिवापर धोकादायक – सुबिर गोकर्ण

मुंबई, दि. १० – डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन थोपविण्यासाठी परकीय चलनसाठ्याचा अतिवापर धोकादायक ठरु शकतो, असे रिझर्व्ह बँकेचे डेप्युरी गव्हर्नर सुबिर गोकर्ण यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसात रिझर्व्ह बँकेला रुपयाचे अवमूल्यन कमी करण्यासाठी बाजारात डॉलरची विक्री करावी लागली होती. रुपयाची घसरण सुरु असलेल्या काळात अनेकांकडून ही घसरण रोखण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर आहे. मात्र, यावर केवळ तात्पुरती लमपट्टीच आम्ही करु शकतो, असे औद्योगिक संघटन असलेल्या ‘फिक्की‘ च्या कार्यक्रमात गोकर्ण म्हणाले.
    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडाला आहे. देशाची कच्च्या तेलाची ८० टक्के गरज ही आयातीतून भागविली जाते. परिणामी निर्यातीपेक्षा आयातीचे प्रमाण वाढते व व्यापारी तूट वर्षागणिक फुगत असून, चालू खात्यातील तूट वाढत आहे. यामुळे रुपयाचे होणारे अवमूल्यन रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला वारंवार हस्तक्षेप करावा लागत आहे.
    रुपयाच्या अवमूल्यनामुळे देशातील उद्योगांच्या खर्चात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर ते जानेवारीच्या सुरुवातीला रुपयावर मोठ्या प्रमाणावर दबाव वाढला होता. आता मार्चपासून पुन्हा रुपयाने घसरणीचा मार्ग पकडला आहे. २०११ – २०१२ या आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या ४ टक्के राहण्याची शक्यता आहे. आदल्यावर्षी ही तूट २.७ टक्के होती. ब्राझिल मेक्सिको व दक्षिण आफ्रिका या देशाच्या चलनांचीही हीच स्थिती आहे, असेही गोकर्ण यांनी सांगितले.

Leave a Comment