
नवी दिल्ली दि.१२- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षात म्हणजे २०१३ सालात होणार असल्याची माहिती मिळाली असल्याचा गौप्यस्फोट केला असून या संबंधी दिल्लीत कांही राजकीय पक्षांची गुप्त बैठकही झाली असल्याचा व त्या बैठकीला उपस्थित असलेल्यांकडूनच ही माहिती मिळाल्याचा दावा केला आहे.
भाजपने ममतांच्या या दाव्याचे स्वागत केले असून पक्षाचे प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी ममतांना सध्याच्या आघाडी सरकारपासून लवकर मुक्तता हवी असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यातूनच निवडणुका अलिकडे येणार असल्याचा दावा ममता करत आहेत असे सांगून शहनवाज हुसेन म्हणाले की आम्ही निवडणुकांना कधीही तयार आहोत. अगदी यंदाच्या वर्षात सुद्धा आम्हाला निवडणुका चालतील. कारण जेवढ्या लवकर हे सरकार जाईल तेवढे चांगलेच आहे.
काँग्रेसने मात्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणका पूर्वीप्रमाणेच २०१४ सालातच होतील आणि आमचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असे म्हटले असले तरी अलिकडेच सोनिया गांधी यांनीही निवडणुकांच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही असे कांही श्रेष्ठींचे म्हणणे आहे. येथे लोकशाही असल्यामुळे मतस्वातंत्रता आहे त्यामुळे कोणी कांहीही मत व्यक्त करू शकतो. पण ममतांनी त्यांच्या पक्ष निवडणूकीला सामोरा जाण्यास सज्ज असल्याचे सांगून आणखीनच गोंधळ निर्माण केला आहे हे नक्की.