‘दादा स्टाईल’ – ‘मला एक चानस हवा’

मराठी चित्रपटसृष्टीसाठी दादा कोंडके हे नाव आजही तितकचं लोकप्रिय आहे. सातत्याने नऊ चित्रपट सिल्व्हर ज्युबिली होणं हा आजवरचा दादांचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेलं नाही. यशाचा फॉर्म्युला सातत्याने तोच राखण्यासाठी दादांनी तेच कलाकार, पार्श्वगायक, तंत्रज्ञ आपल्या चित्रपटांमध्ये ठेवले. आजही दादांच्या चित्रपटांची जादू ओसरलेली नाही.  हीच जादू पुन्हा अनुभवण्यासाठी विठ्ठल किसन चव्हाण यांनी दादा कोंडके यांच्या प्रेमापोटी दादांसोबत काम केलेल्या सर्व कलाकारांना आणि तंत्रज्ञांना एकत्र आणून धमाल विनोदी चित्रपट तयार केला आहे.
    दादांच्या सुरूवातीच्या चित्रपटाची कथा लिहिण्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत सर्व जबाबदारी सांभाळणारे दादांचे सहकारी बाळ मोहिते यांना या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. तर विठ्ठल किसन चव्हाण यांनी निर्माते म्हणून काम पाहिलं आहे.  रावसाहेब पाटील (कुलदीप पवार) आणि त्याचा पुतण्या बाजीराव (मकरंद अनासपुरे) या दोंघाभोवती ही कथा फिरते. अपघाताने म्युझिकल नाईटची मालकीण बिजलीशी होणारी ओळख बाजीरावला कोणत्या वळणावर नेऊन सोडते हे पडद्यावर पाहणंच इष्ट ठरेल. डॉ. श्रीकांत नरूले यांनी लिहिलेल्या गीतांना अशोक पत्की यांनी संगीत दिलं असून, अवधूत गुप्ते, आनंद शिंदे, नंदेश उमप, वैशाली सामंत, बेला शेंडे या गायकांनी गाणी गायली आहेत तर संग्राम शिर्के आणि जितेंद्र गोळे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.  या चित्रपटात मकरंद अनासपुरे, दिपाली सय्यद, कुलदीप पवार, विजय पाटकर, हेमलता बाणे, चेतन दळवी, विजय कदम , किशोर नांदलगकर, मधु कांबीकर, राघवेंद्र कडकोळ या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Leave a Comment