येडीयुरप्पा संकटात

    कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री असताना वाटप केलेल्या खाण परवान्यांची चौकशी सीबाआयने करावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच दिला असल्याने ते तर संकटात आले आहेतच; पण भारतीय जनता पार्टीही अनेक प्रकारच्या संकटात सापडली आहे.  कारण या घटनेने येडीयुरप्पा आता सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता जवळ जवळ मावळली आहे. ही चौकशी बरीच वर्षे चालेल आणि तो पर्यंत भारतीय जनता पार्टीत त्यांचा उदय होणार नाही. आधीच बंगारू लक्ष्मण प्रकरणाने पक्षाची बदनामी झाली आहे. त्यांनी लाच घेतल्याच्या प्रकरणाची सीबीआय कडून चौकशी सुरू होती. त्या काळातही ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर होते. त्यांना न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर  ही गोष्ट उघड झाली आणि सीबीआय कडून चौकशी सुरू असतानाही त्यांना कार्यकारिणीत ठेवले यावरून पक्षावर टीका झाली. आता येडीयुरप्पा यांचीही चौकशी सीबीआय कडून सुरू झाली आहे. अशा स्थितीत येडीयुरप्पा यांना पक्षात कोणत्याही पदावर ठेवणे भारतीय जनता पार्टीला अडचणीचे ठरणार आहे. त्यांना दूरच ठेवावे लागणार आहे. हा पक्षाच्या प्रतिमेचा प्रश्‍न आहे.
    येडीयुरप्पा यांना मात्र ही गोष्ट मान्य नाही. आपण  निर्दोष आहोत असा त्यांचा दावा आहे. खरे तर तसा त्यांचा दावा असणे पुरेसे नाही. त्यांची चौकशी करणार्‍या सीबीआयने तरी तसा निर्वाळा द्यावा लागेल किंवा सीबीआयने खटला भरला तर न्यायालयाने तसा निर्वाळा द्यावा लागेल. तरच भाजपा श्रेष्ठी त्यांना निष्कलंक समजतील आणि, तरच येडीयुरप्पांचे पक्षात पुनर्वसन होईल. अर्थात ही गोष्ट सोपी नाही. आधी तर सीबीआयची चौकशीच अनेक वर्षे चालेल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर खटला भरला जाईल. आधी सत्र न्यायालय, मग उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असा खटल्याचा प्रवास होईल. ही कोर्टबाजी जीवघेणी असेल. वेळ खाऊही असेल. तो पर्यंत राजकीय वातावरण पूर्ण बदलून गेलेले असेल. म्हणून येडीयुरप्पा स्वत:ला निर्दोष जाहीर करीत आहेत आणि आपले पुनर्वसन करावे, एवढेच नाही तर मुख्यमंत्री करावे असा हट्ट धरून बसले आहेत. माणसाला एकदा सत्तेची चटक लागली की काय होते, त्याला सत्तेशिवाय जगणे कसे असह्य होते याचे हे एक उदाहरण आहे. आपल्यावर एवढे गंभीर खटले आहेत आणि आपल्याला मुख्यमंत्री केल्यास जनताच ते स्वीकारणार नाही याचे कसलेही तारतम्य त्यांना राहिलेले नाही आणि ही एक मोठीच समस्या होऊन बसली आहे.
    आपण निर्दोष ठरत नाही तोपर्यंत पदाची मागणी करणार नाही असे येडीयुरप्पा यांनी स्वत:च म्हणायला हवे पण तेवढा मोठेपणा तेही दाखवत नाहीत. पद मिळावे म्हणून ते केवळ हट्टच धरून बसले आहेत, असे नाही तर त्यासाठी ते पक्षात कारवाया करीत आहेत. आपल्या समर्थनार्थ वळवण करणार्‍या आमदारांच्या साह्याने शक्तिपरीक्षण करून उगाचच पक्षात अस्वस्थता निर्माण करीत आहेत. या गडबडीचा त्यांनाही फायदा होणार नाही आणि पक्षालाही नाही याची त्यांना जाणीव नाही. त्यांना आपल्या विरोधात किती गंभीर आरोप आहेत याची जरासीही जाणीव नाही. त्यांनी आताचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना सुखाने कारभार करणे दुरापास्त करायचे ठरवले आहे. शेवटी गेल्या आठवड्यात सदानंद गौडा यांचा संयम संपला आणि त्यांनी येडीयुरप्पा यांच्या या येडेपणाची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. याउपरही येडीयुरप्पांचा हट्ट कायम आहे. ते लिंगायत समाजाचे आहेत आणि त्यांच्या या राजकारणाला  आता जातीयवादी वळण लागले आहे. लागले आहे म्हणजे  लावले जात आहे. येडीयुरप्पा यांच्यावर भाजपा श्रेष्ठी फार अन्याय करीत आहेत आणि त्यांचा मुख्यमंत्रिपदावर हक्क असताना तो नाकारत आहेत अशी भावना लिंगायत समाजात निर्माण केली जात आहे.
    यामागे येडीयुरप्पा स्वत: तर आहेतच पण कॉंग्रेसचेही नेते आहेत. येडीयुरप्पा यांना ही भावना निर्माण करून भाजपा श्रेष्ठीवर दबाव आणायचा आहे. आपल्याला तातडीने पुन्हा मुख्यमंत्री न केल्यास लिंगायत समाज भाजपापासून दूर जाईल अशी भीती ते दाखवत आहेत. हा समाज दूर गेल्यास भाजपाला कर्नाटकात काही भवितव्य नाही असा युक्तिवाद ते आणि त्यांचे समर्थक करीत आहेत. यात तथ्य आहे पण फार नाही, कारण लिंगायत समाजाला येडीयुरप्पांची पापे दिसतच आहेत. भाजपाने येडीयुरप्पांच्या ऐवजी अन्य कोणा तरी लिंगायत नेत्याला मोठे केले, तर लिंगायत समाजाचा पाठींबा भाजपाला टिकवता येऊ शकतो; पण त्या ताकदीचा लिंगायत नेता भाजपात नाही. आहेत ते ईश्‍वरप्पा म्हणावे तेवढे प्रभावी नाहीत. भाजपाची ही अवस्था धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी झाली आहे. तिचा फायदा घेऊन कॉंग्रेसचे नेते आता लिंगायत समाजाच्या जखमेवर फुंकर मारायला पुढे सरसावले आहेत. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या नुकत्याच कर्नाटकाच्या दौर्‍यावर आल्या आणि त्या काही लिंगायत धर्मगुरुंना आवर्जुन भेटून गेल्या, असे हे राजकारण वळणे घेत आहे.

Leave a Comment