महाविद्यालयीन प्रवेशासाठी महाराष्ट्रात सर्वत्र ऑन लाईन सुविधा

पुणे, दि. ८ – इयत्ता १२ वी नंतर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेशासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुविधा देण्याकरीता एक प्रणाली विकसित केली आहे. शासनाच्या ई-सुविधा प्रकल्पाअंतर्गत येत्या शैक्षणिक वर्षापासून ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया ऐच्छिक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
    पुणे आणि नांदेड विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी या प्रणालीचा स्वीकार केला आहे. सावंत म्हणाले, सदर प्रणालीमुळे ऑनलाईन अर्जामध्ये महाविद्यालयाच्या गरजेप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती घेण्यात येईल. विद्यार्थ्याने स्वत: अर्ज भरल्यामुळे त्याची माहिती अचूक व पूर्ण भरली जाईल. विद्यार्थ्याला फक्त योग्य विषयच निवडता येतील व त्यासाठी समुपदेशनाची गरज राहणार नाही. एकाच लॉगइन मधून तीच ती माहिती पुनःपुन्हा न भरता अनेक महाविद्यालये व अभ्यासक्रमांना अर्ज करता येईल. अर्ज यशस्वीरीत्या अपलोड झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे मिळेल.
    याचबरोबर महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यातील व विदेशातील विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये अर्ज करू शकतील.महाविद्यालयात उपलब्ध असलेले अभ्यासक्रम, विषय, मान्यताप्राप्त तुकड्यांची संख्या आदी माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यांना विद्यार्थ्यांच्या हस्तलिखित अर्जांची सॉफ्टवेअर मध्ये डाटा एन्ट्री करण्याची आवश्यकता राहणार नाही. सदरील प्रणाली उपलब्ध असलेले  www.ugpgadmission.com हे संकेतस्थळ २१ मे पासून कार्यान्वित होईल असे सावंत यांनी सांगितले.

Leave a Comment