
नवी दिल्ली, दि. ११ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र एनसीईआरटीच्या पुस्तकात छापण्यात आल्यामुळे शुक्रवारी लोकसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. याचे पडसाद राज्यसभेतही उमटले आणि तेथील कामकाजही दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच व्हीसीके पक्षाचे थिरूमा वलवन थोल यांनी आंबेडकरांच्या व्यंगचित्राचा मुद्दा प्रस्थापित केला. या प्रकरणाशी संबंधित पुरावे हातात घेवून ते लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्याजवळ आले. भाजपा, बसपा, सपा आणि कॉंग्रेससहित सर्व राजकीय पक्षांनी या पुस्तकाचा निषेध केला.
या व्यंगचित्राबाबत दोन दिवसांपूर्वीच माहिती झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ मंत्री कपील सिब्बल यांनी सांगितले. तर या प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली जाईल, असे सांगण्यात आले. सदर व्यंगचित्र पुस्तकातून हटविण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याचे आश्वासन सिब्बल यांनी दिले. यावर लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार म्हणाल्या की, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
‘सभागृहातील सदस्यांच्या भावना आपण समजू शकतो’, असे केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी म्हणाले. तसेच हे पुस्तक कोणी प्रकाशित केले, याबाबत आपल्याला माहिती नाही असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी नमुद केले.
शंकर नावाच्या व्यंगचित्रकाराने १९६० मध्ये सदर व्यंगचित्र काढले होते. राज्यघटना तयार करण्यास लागलेल्या तीन वर्षांच्या कालावधीबाबत संताप व्यक्त कऱणारे, असे हे व्यंगचित्र आहे.
