रूपयातील घसरणीमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार

 नवी दिल्ली/मुंबई दि.११- टिव्ही, डिजिटल कॅमेरे, संगणक, मोटर गाड्या, मोबाईल्स यांच्या किंमती पुढील आठवडयात पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून डॉलरच्या तुलनेत रूपयाची होत असलेली घसरण हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रूपयाची विक्रमी घसरण नोंदविली गेली असून तो ५३.८६ वर गेला आहे. गुरूवारी डॉलर रूपयाचा विनिमय दर एकास ५३.५० रूपये होता. आगामी काळात हाच दर एका डॉलरला ५५ ते ५६ रूपयांवर जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजेच गेल्या दोन महिन्यात रूपयाचा दर १० टक्के घसरला असून तो ४९ वरून ५३.८६ वर आला आहे.
  याचाच परिणाम म्हणून सॅमसंग, पॅनासोनिक, अकाई, ब्लॅकबेरी, कॅनन, डेल, व एसर या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनात ६ टकके वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनन इंडियाचे वरीष्ठ उपाध्यक्ष अलोक भारद्वाज यासंदर्भात म्हणाले की रूपयाचा दर डॉलरला ५१ रूपयांवर असेल असे गृहित धरून या उत्पादनांचे दर ठरविण्यात आले होते. मात्र रूपया बराच घसरल्याने पुन्हा दरवाढ अटळ आहे. दोन महिन्यातील ही दुसरी दरवाढ असून पहिली दरवाढ ३ ते ६ टक्के होती व उत्पादन शुल्कात करण्यात आलेल्या २ टक्के वाढीमुळे ती केली गेली होती.
   कार उत्पादकांनीही आपल्या उत्पादनांचे दर वाढविण्याचे ठरविले आहे. रूपयात घसरण होत आहे आणि बहुसंख्य कार उत्पादक बरेचसे सुटे भाग आयात करतात. रूपया घसरल्यामुळे सुट्या भागांसाठी अधिक पैसा खर्चावा लागतो आहे. मात्र या क्षेत्रात स्पर्धा तीव्र असल्याने दरवाढ अतिशय विचारपूर्वक करावी लागते आहे.रूपयाची घसरण थांबली नाही तर दरवाढीला पर्यायच राहणार नाही असे टोयोटो किर्लोस्करचे उपसंचालक संदीप सिंग यांनी सांगितले. टोयोटो, व्होक्सवॅगन, मारूती सुझुकी, या सर्वच कार उत्पादक कंपन्यांनी सध्या थांबा आणि पहा हे धोरण स्वीकारले आहे. तसेच सुटे भाग आयात करण्यापेक्षा स्थानिक लोकांकडूनच ते बनवून घ्यावेत व आयात कमी करावी असाही विचार केला जात आहे. टोयोटोचे ५० टकके सुटे भाग आयात केले जातात तर मारूतीचे २५ टक्के सुटे भाग आयात होतात.
  पॅनासोनिक इंडियानेही त्यांच्या सर्व उत्पादनांत ३ ते ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तर सॅमसंगने सध्या दरवाढ न करता परिस्थितीवर लक्ष ठेवणेच पसंत केले आहे. नोकिया, ब्लॅकबेरी यांनीही सध्या आस्ते धोरण ठेवले आहे मात्र आठवड्याभरात रूपया स्थिर झाला नाही तर टिव्ही, मोबाईल, कॅमेरे, संगणक यांच्या किंमती वाढविल्या जातील असे संबंधित अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

Leave a Comment