
नवी दिल्ली, दि. ११ – टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी जामीनासाठी केलेल्या अर्जावरील आपला निर्णय विशेष सीबीआय न्यायालयाने १५ मे पर्यंत राखून ठेवला. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात गेल्या वर्षीच्या २ फेब्रुवारीपासून ए. राजा कारागृहात आहेत. या खटल्यातील अन्य १३ आरोपींना सर्वोच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय आणि विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला असताना आपल्याच बाबत असा भेदभाव का, असा मुद्दा द्रमुक खासदार ए. राजा यांनी आपल्या जामीन अर्जात उपस्थित केला होता. आपण निर्दोष आहोत आणि आपल्याविरूद्धचा खटला म्हणजे एक कुभांड आहे, असे त्यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.