शैक्षणिक साहित्य वाटपाचा १९८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर

मुंबई, दि.१० – मुंबई महानगरपालिका शाळेतील इयत्ता १ ली ते १० वी शिकणार्‍या साडेचार लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्याना दरवर्षी देण्यात येणार्‍या २७ प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचा सुमारे १९८ कोटींचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी पक्षाने बहुमताचा जोरावर मंजूर केला. या शैक्षणिक साहित्यात गणवेश, बूट, टाय, दप्तर, कंपासपेटी, रंगपेटी, पाठयपुस्तके, रेनकोट, छत्री, आदींचा समावेश आहे.
    या प्रस्तावाप्रसंगी मनसेचे सदस्य संदीप देशपांडे यांनी प्रशासनतर्फे देण्यात येणार्‍या शैक्षणिक साहित्याचे दर हे नामांकित कंपनीच्या बाजारभावापेक्षा जास्त असून, त्या वस्तूंचा दर्जा योग्य नसल्याने विद्यार्थ्याना महागड्या दराने वस्तू देण्यास विरोध केला.
    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ, मनसेचे नेते चेतन कदम गतवर्षी किती विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले याची माहिती मागितली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक हाजम खान व कॉंग्रेसची शीतल म्हात्रे यांनी पालिकेतर्फे विर्द्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शैक्षणिक साहित्याचे नमूने सादर करण्याची मागणी केली.
    मात्र सभागृहनेते यशोधर फणसे, शिक्षण समिती अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांनी सदर प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली.
    अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी नगरसेवकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत प्रस्ताव मंजूर करण्यास सांगितले. अखेर प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.    

Leave a Comment