ठाणे जिल्हयात क्रीडा विद्यापीठाची स्थापना

मुंबई दि.१०- राज्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने स्टेट ऑफ आर्ट स्पोर्टस विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे ५० एकर जागा महसूल विभागाने उपलब्ध करून दिली असल्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी सांगितले.
  या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की आपल्याकडे खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची कमतरता आहे असे लक्षात आले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खेळांसाठी प्रशिक्षक तयार करणे व त्यासाठी योग्य तो अभ्यासक्रम, शारीरिक शिक्षण संशोधन व आधुनिक क्रीडा तंत्रज्ञान संशोधन यासाठी विशेष लक्ष पुरविले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनांप्रमाणेच या क्रीडा विद्यापीठाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात क्रीडा संकुलाचाही समावेश आहे. या ५० एकर जागेत १० एकरांवर दाट झाडी आहे मात्र ही झाडे तोडली जाणार नाहीत तर त्यांचे जतनच केले जाईल. क्रीडा क्षेत्राला सरकार प्रोत्साहन देत असून  धारावी येथे बांधला गेलेला २२ कोटी रूपये खर्चाच्या मुंबई जिल्हा स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे उद्घाटन जूनमध्ये केले जात आहे.
  वळवी म्हणाले की युवा कल्याण व क्रीडा योजनात अधिक स्पष्टता यावी आणि त्याची अम्मलबजावणी अधिक गतीने व्हावी यासाठी लवकरच मुख्यमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दोन उच्चस्तरीय समित्या नेमण्यात येत आहेत.दर तीन महिन्यांनी या समित्यांची बैठक होणार असून त्यात प्रगतीसंदर्भातला आढावा घेतला जाणार आहे.
  लंडन ऑलिंपिक्ससाठी पात्र ठरलेला रेस्टलर नरसिंग यादव याला शासनातर्फे १५ लाख रूपयांची मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ऑलिंपिक्ससाठी पात्र ठरलेल्या राणी सरनोबत व जलतरणपटू वीरधवल खाडे यांनाही शासनाने १५ लाख रूपयांची मदत दिली होती असेही ते म्हणाले.

Leave a Comment