चाहूल गणेशोत्सवाची

गणेशोत्सवाला अजून चार महिने सवड असली तरी महत्वाच्या गणेशमंडळांची कामाला सुरुवात झाली आहे. गेली १२० वर्षे सतत वाढत राहिलेला महोत्सव असे या महोत्सवाचे वर्णन करावे लागेल. पुण्यातील गणेशभक्तीची परंपरा काय आहे, हे या निमित्ताने समजून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गणेशोत्सवाच्या वाढीस विजापूरचा अदिलशहा दुसरा इब्राहिम यांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. कारण तो अदिलशहा  गणपती आणि सरस्वती या विद्येच्या दैवतांना आईवडील मानत असे. त्याच्या मुद्रेवरही तसा उल्लेख असे. पुण्याच्या कसबा गणपतीला त्याने १२० एकर जमीन दिली होती. तेच दैवत पुढे सार्वजनिक गणपतीचे मूलाधार बनले .

शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांनी गणेशपूजेस सामाजिक आणि राष्ट्रीय अधिष्ठान दिले. राष्ट्र पुननिर्माणाच्या महासंगरात गणेशोत्सवाला अग्रपूजेचा मान मिळाला. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांना ज्या कारणासाठी स्वराज्य गणेशाची स्थापना करावी लागली आणि एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लोकमान्यांना  गणेशोत्सवाची स्थापना करावी लागली.

त्या कारणासाठी कदाचित एकविसाव्या शतकातही त्या जागरणाची आठवण विसरून चालणार नाही. कारण कदाचित बहुराष्ट्रीय कंपन्याच्या माध्यमातून पुन्हा अनेक ईस्ट इंडियन कंपन्या घिरट्या घालत आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाची आवश्यकता भासू शकेल.

देशाच्या फार मोठया भागात गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा होतो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र आणि तामीळनाडू या राज्यांचा समावेश आहे. हा गणेशोत्सव सुरू होण्यास लोकमान्यांची प्रेरणा कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे.

शिवाजी महाराजांनी बालवयातच १६३६ साली पुण्यात पहिला गणेशोत्सव सुरू केला.  गणेशोत्सवाचा एवढा विस्तार होण्यात लोकमान्य टिळक वा छत्रपती शिवाजी महाराज यांची जेवढी निर्णायक भूमिका आहे,  तेवढीच निर्णायक भूमिका विजापूरचा इ.स. १५७९ ते १६२७ दरम्यान गादीवर असलेला इब्राहीम दुसरा आदिलशहा याची आहे.

वास्तविक विजापूरची आदिलशाही ही दीर्घकाळ मूर्तिभंजनासाठी प्रसिद्ध आहे. तरी दुसरा इब्राहीम आदिलशहा यांची गणेशोत्सवाच्या वाढीतील सिंहाचा वाटा दुर्लक्षण्यासारखा नाही. कारण तो देवी सरस्वती आणि ओंकारमूलक गणपती या विद्येच्या दैवतांना आपले आई वडील मानत असे. अठ्ठेचाळीस वर्षे आदिलशाहीवर असलेल्या दुसर्‍या इब्राहिमने स्वत:च्या प्रत्येक पत्राची सुरुवात सरस्वती आणि गणपती यांच्या वंदनाने केली आहे. लोकमान्यांच्या प्रेरणेने सुरु झालेला गणेशोत्सव जगभर कसा पसरला, त्याची एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील कामगिरी कोणती आणि अजून या गणेशोत्सवापुढे कोणती आव्हाने आहेत, ही सारी माहिती या सदरात देणार आहोत.

Leave a Comment