
वॉशिग्टन, दि.९ – कोणत्याही परिस्थितीत इराणला आम्ही अण्वस्त्रे बनवू देणार नाही. अण्वस्त्रे बनविण्याचे इराणचे प्रयत्न आम्ही सर्व शक्तीनिशी मोडून काढू, असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जो. बिडेन यांनी म्हटले आहे.
अटलांटा येथे बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जी धोरणे अवलंबित आहेत, त्यांची प्रशंसा केली. इराण आणि त्या देशाची मित्रराष्ट्रे आपल्या शेजारी देशांना धमकावित होती. इराणसंदर्भात आम्ही एकेक्षणी एकटे पडलो होतो. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. इराणसंदर्भात अमेरिकी सरकारने जी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेला विविध देशांनी पाठिबा दिला आहे. त्यामुळेच आज इराण एकटा पडलेला दिसत आहे असेही ते म्हणाले.
आपल्या आण्विक कार्यक्रमांच्या आडून इराण अण्वस्त्रे तयार करीत असल्याची दाट शंका इस्रायल आणि अन्य पाश्चिमात्य देशांना आहे. पण आपला आण्विक कार्यक्रम हा पूर्णपणे शांततामय कार्यासाठीच आहे, असे इराणने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. असे असले तरी अण्वस्त्रे प्राप्त करण्याचे इराणचे सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
