
नवी दिल्ली, दि.१० – लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या विरूद्ध लेफ्टनंट जनरल (निवृत्त) तेजिंदरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे. यासंदर्भात आपल्या हाती आणखी काही पुरावे लागले आहेत. हे नवे पुरावे आणि माहिती जोडून सक्षम न्यायालयात नवी याचिका दाखल करण्याचा आपला विचार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
संरक्षणविषयक काही साधनसामग्री खरेदी करण्यासाठी तेजिंदरसिंह यांनी आपणास १४ कोटी रूपयांची लाच देवू केली होती, असा सनसनाटी आरोप लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी अलीकडेच केला होता. त्यानंतर तेजिंदरसिंह यांनीही लष्करप्रमुखांवर काही आरोप करून त्यांच्याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) तेजिंदरसिह यांच्या मते, त्यांच्याकडे आणखी काही पुरावे आहेत. त्यांच्याकडे जे पुरावे आहेत, ते घेवून ते थेट सर्वोच्च न्यायालयात जावू शकत नसल्याने, ते उच्च न्यायालयात जाणार आहेत. हे सर्व प्रकरण योग्य त्या न्यायालयात उपस्थित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती तेजिंदरसिंह यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयास केली होती. ती विनंती मान्य करून न्यायमूर्ती पी. सत्शिवम यांनी याचिका मागे घेण्यास परवानगी दिली.