एअर इंडियाचा संप तिसर्‍या दिवशीही सुरूच, २० उड्डाणे रद्द

दिल्ली, दि. १० – एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप गुरूवारी तिसर्‍या दिवशीही सुरूच असल्यामुळे एअर इंडियाला मुंबई आणि दिल्लीतील २० उड्डाणे रद्द करावी लागली. तर वैमानिकांच्या संपावर कडक पावले उचलत एअर इंडियाने गुरूवारी आणखी ९ वैमानिकांना घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे गुरूवारपासून यूएस, कॅनडा आणि युरोपकडे जाणार्‍या विमानांचे बुकिंग १५ मेपर्यंत बंद करण्यात आले आहे.
    बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप बेकायदशीर ठरवून देखील वैमानिक कामावर रूजू झाले नाहीत. तर आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. वैमानिकांच्या कमतरतेमुळे गुरूवारी मुंबईतून तीन आणि दिल्लीतून ८ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे एअर इंडियाच्या अधिकार्‍याने सांगितले. तर दिल्ली विमानतळावर १२ आंतरराष्ट्रीय विमानांचे आगमनही रद्द करण्यात आले.
    एअर इंडियाचे अधिकारी प्रवाशांना कोणतेही सहकार्य करत नसल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिल्लीहून फकफर्ट, शांघाय, टोरंटो, न्यू जर्सी आणि सेऊलकडे जाणारी उड्डाने रद्द करण्यात आली. तर मुंबईहून न्यूयॉर्क, रियाध आणि शांघाय ही उड्डाने रद्द केली.
    दरम्यान, वैमानिकांनी पुकारलेल्या या संपावर कडक पावले उचलत एअर इंडियाने बुधवारी २६ वैमानिकांना काढून टाकले. त्यामुळे बाहेर काढण्यात आलेल्या वैमानिकांची संख्या ४५ झाली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अजित सिंह यांनी वैमानिकांना कामावर रूजू होण्यास सांगितले आहे. कामावर रूजू झाल्यानंतर चर्चा करण्यात येईल, असे ते म्हणाले.   

Leave a Comment