उग्र वायू पसरल्याने राज्यसभा काही काळ तहकूब

नवी दिल्ली, दि.१० – राज्यसभेत गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास चालू असताना सभागृहामध्ये पसरलेल्या उग्र वासावरून काही काळ घबराटीची स्थिती निर्माण झाली. हा वास कसला आहे, याची विचारणा सदस्यांनी अध्यक्ष हमिद अन्सारी यांच्याकडे केली. सदस्यांच्या तक्रारींची दखल घेवून अध्यक्ष अन्सारी यांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. उग्र वायू पसरण्याचा प्रकार घडला त्यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेही सभागृहात उपस्थित होते.
   राज्यसभेच्या अधिकारी वर्गांसाठी असलेल्या गॅलरीमध्ये गेल्या १५ दिवसांपासून दुर्गंधी येत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारही करण्यात आली होती. संबंधीत खात्याच्या अधिकार्‍यांकडून परिसराची तपासणी करण्यात आली. पण या दुर्गंधीबाबत ठोस उपाययोजना मात्र करण्यात आली नव्हती.
  खासदार डी. राजा यांनी या प्रकाराबद्दल बोलताना सांगितले की, सभागृहामध्ये एक प्रकारची दुर्गंधी पसरल्याचे उपस्थित सदस्यांच्या लक्षात आले. हा उग्र वास कसला आहे, ते मात्र आम्हाला कळले नाही. पण हा वास कशाचा आहे याचा शोध लागणे मात्र गरजेचे होते. सभागृहात पसरलेल्या या उग्र वासामुळे काहीशी घबराट निर्माण झाली होती.

Leave a Comment