‘ बाबूरावला पकडा’ चे चित्रीकरण व संगीतही बँकाकमध्ये

परदेशात शुटिंग करण्याचा चित्रपटांचा ट्रेंड तसा जुनाच. बिग बजेट हिंदी चित्रपटांच्या परदेशवार्‍या आपण नेहमीच ऐकतो, पण एखादया मराठी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण परदेशात होतेय असे आजवर तरी ऐकीवात नाही. तन्मय सेनगुप्ता आणि अश्‍विन कुमार क्षीरसागर यांची निर्मिती असलेला ‘बाबूराव ला पकडा’ या मराठी चित्रपटाने आपल्या भल्यामोठया स्टारकास्टसह परदेशवारी केली असून, हा चित्रपट पूर्णपणे बँकॉकमध्ये चित्रीत झाला आहे. येत्या २५ मे ला ‘बाबूराव ला पकडा’ हा चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय.
    साई व्हिजन शोबिझ निर्मित, वॉचटॉवर इंटरनॅशनल पस्तुत ‘बाबूराव ला पकडा’चे दिग्दर्शन आशिष उबाळे यांनी केले आहे. भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर, समीर धर्माधिकारी, सई ताम्हणकर, सिया पाटील, मिना कँवर, पियल पाटील, अभिजीत चव्हाण, अमृता देशमुख, अश्‍विन क्षिरसागर अशा नामवंत मराठी कलाकारांसोबत हिंदीतील अभिनेता शक्ति कपूर यांचीही यात विशेष भूमिका आहे.
      जंगली म्युझिक कंपनी तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘बाबूराव ला पकडा’ च्या ध्वनीफितीत ६ गीतांचा समावेश आहे. गीतकार सागर पवार व ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिलेल्या या गीतांना दुर्गा नटराज यांनी संगीत दिले आहे. मिस कॉल.. हे आयटम सॉंग वैशाली सामंत यांनी ठसकेबाज स्वरात गायले असून जमणार नाही.. या गीताला आनंद शिंदे, मधुरा दातार यांनी आपल्या स्वरांचा ताल धरला आहे. ‘बाबूराव ला पकडा’ हे शीर्षक गीत जोजो यांनी कोरसच्या साथीने गायले आहे, तर पावसाने कसा घात केला.. हे भावगर्भ गीत रविंद्र साठे आणि आकृती कक्कड यांच्या आवाजात स्वरबध्द झालं आहे, तर आग लागली तन मनात.. हे गीत मधुरा दातार यांच्या बहारदार आवाजात ऐकायला मिळणार आहे. याशिवाय तू स्टेनगन है.. हे धमाल गीत अभिनेता संजय नार्वेकर यांनी गायिका रितू पाठक यांच्यासोबत गायले आहे.
 चित्रपटाची कथा – पटकथा दिग्दर्शक आशिष उबाळे यांची असून संवाद आशिष यांच्या बराबर शशांक केवले आणि श्याम पेटकर यांना लिहिले आहेत. छायाचित्रण दामोदर नायडू केले आहे. मिलन तारी यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते वैभव शहा आहेत.
 बाबुराव या व्यक्तिरेखे भोवती फिरणारी ही कथा असून, त्यात प्रासंगिक विनोदावर भर देण्यात येणार आहे. शंभर टक्के परदेशात चित्रीत होणारा ‘बाबूराव ला पकडा’ हा बहुदा पहिलाच मराठी चित्रपट आहे. आता हयातील बाबुराव कोण ? आणि सर्वजण त्याला पकडण्यासाठी एवढे आतूर का झालेत ? हे २५ मे ला चित्रपट पदर्शित झाल्यानंतरच समजेल. त्यापूर्वी यातील गीतांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

Leave a Comment