भारताकडेही क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली तयार

नवी दिल्ली, दि. ७- अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्यानंतर आता भारताने क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली सज्ज केली आहे. लवकरच ही प्रणाली देशातील दोन महत्वाच्या शहरांमध्ये तैनात केली जाणार असल्याचे देशाच्या संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेचे प्रमुख (डीआरडीओ) व्ही. के. सारस्वत यांनी सांगितले. चीन आणि पाकिस्तानच्या संहारक क्षेपणास्त्रांच्या छायेत वावरणार्‍या देशवासीयांसाठी ही दिलासादायक आणि अभिमानास्पद अशीच बातमी आहे.
  जगातील काही मोजक्या देशांकडेच अशा प्रकारचे तंत्रज्ञान आजघडीला उपलब्ध आहे. डीआरडीओने सध्या विकसित केलेली ही प्रणाली शत्रूराष्ट्राने डागलेले क्षेपणास्त्र सुमारे २००० किमी अंतरावर असताना त्याचा भेद करण्याची क्षमता असलेले आहे. आगामी काळात ही क्षमता वाढवून ५००० किमी पर्यंत नेणार असल्याचे सारस्वत यांनी स्पष्ट केले. देशातील दोन महत्वाची शहरे निश्चित करून लवकरच तेथे ही प्रणाली तैनात केली जाईल, असे सारस्वत यांनी नमूद केले.