परकीय गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराला धक्का

या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. मात्र स्टँडर्ड अॅण्ड पूअर्सने (एस अॅण्ड पी ) भारताची गुंतवणूकीची पत घटविल्यानंतर या गुंतवणूकदारांनी ७७७ कोटी रूपयांचा पैसा काढून घेतला. नोव्हेंबर २०११ पासून पहिल्यांदाच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी असा पावित्रा घेतल्यामुळे, २७ एप्रिलपर्यंत सेन्सेक्समध्ये २१७ अंशांची घट झाली आहे. याचा किरकोळ गुंतवणूकदारांना चांगलाच फटका बसला आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांना ३९ हजार आठ कोटी रूपयांची शेअर खरेदी केली. तर ३९ हजार ७८५ कोटी रूपयांच्या शेअरची विक्री केली. यामुळे एकूण ७७७ कोटी रूपये काढले गेले.

२०१२ च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये शेअर बाजारात विक्रमी ४३ हजार ९५१ कोटी रूपयांची परकीय गुंतवणूक झाली. यामध्ये जानेवारीत १० हजार ३५८ कोटी, फेब्रुवारीत २५,२१२ कोटी १० लाख; तर मार्चमध्ये ८३८१ कोटी रूपयांची गुंतवणूक झाली. रिझर्व्ह बँकेने सौम्य केलेले पतधोरण व बाजारात वाढलेला खेळता पैसा यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी शेअरची भरभरून खरेदी केली. मात्र, एप्रिलमध्ये विविध कारणांनी गढूळ झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील परकीय गुंतवणूकीचा ओघ आटला. उलट ७७७ कोटी रूपयांचा पैसा काढून घेतल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी चांगलाच धक्का दिला

Leave a Comment