विधानपरिषदेसाठी ४० अर्ज दाखल, कॉंग्रेसमध्ये बंडखोरी

मुंबई, दि. ७ – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या हा महिना अखेर होणार्‍या ६ जागांच्या निवडणुकीसाठी सोमवारी दिवसअखेरपर्यंत ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. मतदान ३० मे रोजी होणार आहे.
    विधानपरिषदेच्या नाशिक, परभणी आणि चंद्रपूर स्थानिक स्वराज्य मतदार संघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही सत्ताधारी आघाडीतील पक्षांत बंडखोरी झाली आहे. तर अमरावतीमध्ये कॉंग्रेस आणि भाजपा उमेदवारांत थेट लढत होण्याची शक्यता आहे.
    लातूर-उस्मानाबाद मतदारसंघातून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू आणि विद्यमान आमदार दिलीप देशमुख यांनाच कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे सचिन पवार आणि भाजपाचे सुनिल कुलकर्णी निवडणूक लढवित आहेत. नाशिकमध्ये चौरंगी लढत होणार आहे. ही जागा अधिकृतरीत्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने या पक्षाचे जयवंत जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, तर मित्रपक्ष असलेल्या कॉग्रेसचे राजेंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवाय, शिवसेनेचे शिवाजी रहाणे आणि मनसेचे सलीम शेख यांनीही अर्ज दाखल केले आहेत. परभणीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अब्दुल्ला खान दुराणी या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात कॉंग्रेसचे बंडखोर सुरेश देशमुख यांनी अर्ज भरला आहे. चंद्रपूरमध्ये माजी खासदार नरेश पुगलिया यांचे चिरंजिव राहूल पुगलिया यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्याच संगीता अमृतकर यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेथे भाजपाचे नितेश बगाडिया यांनीही अर्ज दाखल केला आहे. मात्र, अमरावतीमध्ये कॉंग्रेसचे अनिरूद्ध देशमुख आणि भाजपाचे प्रवीण पोटे यांच्यात सरळ लढत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या संयुक्त मतदारसंघातून पाटबंधारे मंत्री सुनिल तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांनी आणि शिवसेनेचे उमेश शेटये तसेच अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.       

Leave a Comment