लिंगबदल शस्त्रक्रियेस न्यायालयाची परवानगी

मुंबई, दि. ७ – लिंगबदल शस्त्रक्रिया करून आपल्या प्रियकराशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणार्‍या बिधान बारूआ या युवकाला तशी परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका महत्वपूर्ण निकालाद्वारे दिली. न्यायालयाने हा निर्णय देताना राज्यघटनेतील तरतुदींचा आधार घेतला असला तरी यातून अनेक संवेदनशील प्रश्‍न निर्माण होणार आहेत.  
    बिधान हा युवक स्वतः लहानपणापासूनच मुलगी असल्याचे मानतो. इतकेच नव्हे तर त्याचे भारतीय हवाईदलात कार्यरत असलेल्या एका अधिकार्‍यावर प्रेम देखील आहे. या प्रियकराशी लग्न करण्यासाठी त्याने स्वतःवर लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच्या या निर्णयाला त्याच्या कुटुंबियांचा विरोध आहे. परिणामी १७ एप्रिल रोजी मुंबईतील सैफी रूग्णालयात त्याच्यावर होणारी शस्त्रक्रिया करण्यास रूग्णालय प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे बिधान उर्फ स्वातीने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले व आपणास ही शस्त्रक्रिया कऱण्यास परवानगी न मिळाल्यास आपण आत्महत्या करू, असा इशारा दिला. मात्र न्यायालयाने त्याच्या या धमकीवरून बिधानच्या वकिलांना फटकारून न्यायालयाला ब्लॅकमेल न करण्याबाबत बजावले.
    तथापि सोमवारी झालेल्या सुनावणीत न्या. एस. जी. वजीफदार आणि ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने बिधानची बाजू समजून घेऊन, त्याला दिलासा दिला. सैफी रूग्णालयाला २१ वर्षीय बिधानवर शस्त्रक्रिया करण्यास न्यायालयाने परवानगी दिली. इतकेच नव्हे तर या युवकाच्या मूलभूत हक्कांचा भंग कऱणार्‍यांवर कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाचा संपूर्ण देशातील सामाजिक व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो, अशी भीती सामाजिक शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.   

Leave a Comment