नऊ मिनिटे वाचवताना ६ महिन्यात २९ जीवांचा बळी

पुणे, दि. ८ – पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील ताशी ८० किलोमीटर वेगाची मर्यादा ओलांडून १०० पेक्षा अधिक वेगाने गाडी चालवून वेळेची फारशी बचत होत नसल्याचा निष्कर्ष एका पाहणीत काढण्यात आला आहे. वेगमर्यादा धुडकावून जीव धोक्यात घालत सुसाट गाडी चालवून वेळ वाचतो तो फक्त साडेआठ ते नऊ मिनिटांचा! मात्र हीच नऊ मिनिटे वाचविण्याच्या नादात मागील सहा महिन्यात २९ जणांचा बळी गेला आहे. कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावर यापेक्षा निराळी स्थिती नाही.
    ‘एक्स्प्रेस वे’वर अधिकाधिक ताशी ८० किलोमीटर वेगाने गाडी चालविण्याचे बंधन आहे. हा नियम पाळून चालवली जाणारी गाडी किती वेळात इप्सितस्थळी पोचते आणि नियम धुडकावून १०० पेक्षा अधिक वेगाने पळविण्यात येणार्‍या गाडीची वेळेत किती बचत होते, याचा शोध घेण्याचा प्रयोग ‘एक्स्प्रेस वे’ प्रशासन आणि महामार्ग पोलिसांकडून करण्यात आला. त्यामध्ये यातील फरक अवघ्या नऊ मिनिटांचा असल्याचे समोर आले.
ऑक्टोबर २०११ ते मार्च २०१२ या सहा महिन्याच्या कालावधीत  एक्सप्रेस वेवर पुणे ते खंडाळा यादरम्यान झालेल्या १८ अपघातांत २९ जणांचा बळी गेल्याची माहिती खडकीस्थित महामार्ग पोलीस ठाण्यातून मिळाली. याशिवाय या अपघातात १२ जण गंभीर जखमी, ३१ जखमी आणि २७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. २०११ च्या पहिल्या तीन महिन्यांत झालेल्या अपघातांच्या तुलनेत यावर्षी अपघातांना आळा बसल्याचे पोलीस नाईक डी. बी. वाबळे यांनी सांगितले
    एक्स्प्रेस वेवरील बहुतांश अपघात हे वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याने होतात. गाडीवरील नियंत्रण सुटणे, टायर पंक्चर होणे, वेग व वळणाचा अंदाज न आल्याने गाडी उलटणे, अशा अपघातांचा त्यामध्ये समावेश आहे. एकूण अपघातांपैकी ९० टक्के अपघात वाहनांवरील नियंत्रण सुटणे, वेगमर्यादेचे उल्लंघन यामुळे झाले आहेत. जुन्या-पुणे मुंबई रस्त्यावरील अपघातात दरवर्षी ४०० बळी जातात तर २००१ पासून नवीन हाय-वेवर  झालेल्या अपघातात ५०० बळी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रोज ३० वाहनांवर कारवाई
महामार्ग पोलिसांच्या वतीने रोज साधारणतः ३० वाहनांवर करवाई करण्यात येते. यामध्ये लेन तोडणे, मर्यादेपेक्षा जास्त वेग, टेल लॅम्प नसणे, इंडिकेटर सुस्थितीमध्ये नसणे किंवा वाहतूक नियमांचा भंग यामुळे ही कारवाई करण्यात येते. काही वेळा विशेष मोहीम राबवूनही वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न करण्यात येतात.

Leave a Comment