देहूच्या मंदिरात घुमले तुकाराम चित्रपटातील गीतांचे सूर

पुणे : संत तुकाराममहाराजांची कर्मभूमी असणा-या श्रीक्षेत्र देहू नगरीत काल आगामी ‘तुकाराम’ या चित्रपटातील गीतांचे सूर घुमले. गायक पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजातील गाण्याने या मंदिरात वेगळीच अनुभूती आली.
‘तुकाराम’ या चित्रपटाच्या संगीताच्या सीडीचे प्रकाशन श्रीक्षेत्र देहूगावातील देऊळवाड्यात करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कथा व पटकथा लेखक प्रशांत दळवी, निर्माता संजय छाब्रिया, संगीत दिग्दर्शक अशोक पत्की, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, संत तुकाराम यांची भूमिका करणारा अभिनेता जितेंद्र जोशी, बालकलाकार व गायक पद्मनाभ गायकवाड तसेच चित्रपटातील अनेक कलाकार उपस्थित होते. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्ष शिवाजी मोरे, विश्‍वस्त विश्‍वजित मोरे, पंढरीनाथ मोरे, संजय मोरे, राजेंद्र मोरे, माजी विश्‍वस्त संभाजी मोरे, दिलीप मोरे, पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, सरपंच कांतिलाल काळोखे यांनी या सर्व कलाकारांचा देवस्थानच्या वतीने सत्कार केला.
    हा चित्रपट ८ जून २०१२ रोजी चित्रपटगृहामध्ये झळकणार आहे. चित्रपटाच्या संगीतामध्ये शास्त्रीय आणि आधुनिक संगीताचा अनोखा मिलाफ असून, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व अवधुत गुप्ते यांनी एकत्रितपणे या चित्रपटाच्या संगीताचे दिग्दर्शन केले आहे. कोणत्याही चित्रपट किंवा अल्बमसाठी ही आघाडीची जोडगोळी पहिल्यांदाच एकत्र येत आहे. अशोक पत्की यांनी या चित्रपटासाठी ६, तर अवधुत गुप्ते यांनी २ गाणी संगीतबध्द केली आहेत.
    एक गोष्ट नक्कीच वाखाणण्याजोगी आहे की, संगीत-दिग्दर्शकांनी तुकाराम चित्रपटातील गाण्यांसाठी युवा गायकांच्या चमुचा वापर केला आहे. अनिरूद्ध जोशी सारेगमप विजेता हा तुकारामांचा आवाज बनला आहे. पद्मनाभ गायकवाडने सारेगमप लिटल चॅम्प विजेता बालतुकारामाला आवाज दिला आहे. ज्ञानेश्‍वर मेश्राम व जान्हवी प्रभु अरोरा (हाही सारेगम स्पर्धक) यांनी गाणी गायली आहेत. अवधुत गुप्ते हे या सर्वच गायकांचे सारेगमप दरम्यानचे मार्गदर्शक व गुरू आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी पार्श्‍वगायनामध्ये स्वत:चे असे खास रंग भरले आहे.
    पद्मनाभ गायकवाडने लहानपणीच्या तुकारामच्या गाण्यांसाठी आवाज दिला आहे. त्याचबरोबर त्याने लहानपणीच्या तुकारामची भुमिकाही केली आहे.  प्रख्यात गायक हरिहरन यांनीही तुकाराम साठी एका सोलो गाण्याचे ध्वनिमुद्रण केले आहे. हे गाणे अशोक पत्की यांनी संगीतबध्द केलेले गाणे अत्यंत हद्यस्पर्शी असून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भौगोलिक परिस्थितीच्या पार्श्‍वभुमीवर निर्सगाचे चित्रण रसिकांसमोर साकारले गेले आहे. हरिहरन यांच्या अत्यंत वेगळ्या अशा आवाजाने या गाण्यात वेगळेच रंग भरले आहेत आणि त्यामुळे गाणे या चित्रपटासाठी परमोच्च बिंदू ठरणार आहे.

 

 

Leave a Comment