क्षेपणास्त्र प्रतिरोधक ढाल

    भारतात तंत्रज्ञानाचा विकास गतीने होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संरक्षण सिद्धतेत वाढ करीत आहोत. भारताची ही क्षमता चीनएवढी नसेलही पण ती आपले संरक्षण करील एवढी सक्षम नक्कीच आहे. तिच्यात आता क्षेपणास्त्र प्रतिबंधक ढालीची भर पडली आहे. जगात सर्वांनाच आता अणुबॉंब घेऊन आपल्यावर कोसळणार्‍या क्षेपणास्त्राची भीती बसलेली आहे. भारत, चीन, रशिया आणि अमेरिका हे चार देश चढाओढीने वेगवान आणि मोठ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार करायला लागले आहेत.  कोणत्या वेळी कोणाचे क्षेपणास्त्र कधी डागले जाईल आणि कोणत्या शहराचे लक्ष्य गाठील याचा काही नेम नाही. अशा स्थितीत या क्षेपणास्त्रांचा मुकाबला करणारी काही ना काही यंत्रणा आपल्याकडे असावी, असा सर्वांचा प्रयत्न चालला आहे. १९९० सालच्या आखाती युद्धात अमेरिकेने इराककडून येणार्‍या क्षेपणास्त्रांचा मारा बोथट तसेच निष्प्रभ करण्यासाठी अशा प्रकारच्या यंत्रणेचा वापर यशस्वी रित्या केला होता. क्षेपणास्त्रांचा शोध हा लष्करी साधनांतला सर्वात प्रगत शोध असेल, तर क्षेपणास्त्र विरोधी ढालीचा शोध हा त्यापेक्षा प्रगत आहे. कारण ही यंत्रणा क्षेपणास्त्राचा नक्षा उतरवू शकते. सध्या भारताच्या  संरक्षण सिद्धतेवर साशंकतापूर्वक चर्चा जारी आहे. तरीही भारताचे नित्य एक तरी पाऊल त्या दिशेने पडत आहे.  आंतर खंडीय पृथ्वी या क्षेपणास्त्राचा यशस्वी प्रयोग तर याबाबतीत फारच निर्णायक ठरणार आहे कारण त्याच्या साह्याने आपण अमेरिका वगळता  पूर्ण जगाला लक्ष्य करू शकतो. अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी तयार झाली असून तिची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. त्यातल्या क्षेपणास्त्रामुळे चीनचा फारच जळफळाट झाला. कारण त्याच्या साह्याने आपण चीनची राजधानी बीजिंगवरही अण्वस्त्रे टाकू  शकतो. चीनचाही भारतावर असा हल्ला  होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  अशा प्रसंगी आपण काय करणार ? अणुबॉंब सोबत घेऊन येणारे क्षेपणास्त्र बघता बघता येईल. हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांत झाला तसा विध्वंस करून टाकेल. मोठी भीतीदायकच बाब आहे. मात्र आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांनी अशी भीती बाळगायचे काही कारण नाही असा दिलासा आपल्याला दिला आहे. चीन असो वा पाकिस्तान, त्यांनी भारतावर एखादे क्षेपणास्त्र सोडण्याचे साहस केलेच तर ते क्षेपणास्त्र आपल्या देशावर येऊन आदळण्याआधीच त्याला त्याच्या प्रवासाच्या मार्गातच प्रतिहल्ला करून नष्ट करणारी यंत्रणा भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केली आहे.  गेल्या रविवारी भारताच्या अशा यंत्रणेची चाचणी घेण्यात आली, जगात आतापर्यंत तरी अशी क्षेपणास्त्र हल्ला विफल करणारी यंत्रणा विकसित करण्यात तीनच देशांना यश आले आहे. अमेरिका आणि रशिया हे दोन देश त्यात आहेतच पण अमेरिकेमुळे ही यंत्रणा इस्रायलला मिळाली आहे. या कामात अजून चीनला यश आलेले नाही. अशा यंत्रणा विकसित करण्याची क्षमता पाकिस्तानकडे नाही. आजवर त्या अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळालेल्या आहेत. अण्वस्त्रांच्या बाबतीत मात्र अमेरिका पाकिस्तानला तंत्र आणि साधने देण्याबाबत हात आखडता घेत असते.  म्हणून पाकिस्तानकडे ही यंत्रणा नाही. अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे याबाबत पाकिस्तानला चीनकडून मदत मिळत असते. पण अजून चीनलाच ही ढाल निर्माण करता आलेली नाही म्हणून ती पाकिस्तानकडे नाही. प्रामुख्याने अमेरिका आणि रशिया या दोन मोठ्या देशांनाच या बाबतीत यश आलेले आहे आणि ही यंत्रणा तयार करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. भारताच्या संरक्षण खात्याशी निगडित असणार्‍या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या संघटनेने ही यंत्रणा तयार केली आहे. आपल्याला ती तयार करण्यास चीनपेक्षा पाकिस्तानने अधिक उद्युक्त केले आहे. १९९८ साली पाकिस्तानने भारताच्या बरोबरीने अण्वस्त्रांची चाचणी घेतली. आपणही अण्वस्त्र सज्ज असल्याचे सिद्ध केले होते. पाकिस्तान हा देश अण्वस्त्र सज्ज होणे केवळ भारतासाठीच  नव्हे; तर सार्‍या जगासाठीच धोकादायक होते.  भारत आणि पाक हे दोन देश अण्वस्त्र सज्ज होण्याचे दोन वेगळे अर्थ आहेत. भारत हा जबाबदार देश आहे. भारताने अण्वस्त्र सज्जता जगाला दाखवली आणि आपली अण्वस्त्रे कोणावरही पहिला हल्ला करण्यासाठी नसून शेजार्‍यांना धाक वाटावा (डेटरंट) यासाठी आहेत असे जाहीर केले. पाकिस्तानचे तसे नाही. १९९९ साली कारगील युद्ध झाले. तेव्हा पाकिस्तानचा निर्णायक पराभव होणार हे नक्की होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तानने तसा विचार सुरूही केला होता. त्यांच्या परराष्ट्र सचिवांनी, पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला तर पाकिस्तान अणुबॉंबचा वापर करू शकेल असे म्हटले होते. तेव्हा पासून भारताने अणुबॉंब सोबत घेऊन येणारी क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी यंत्रणा आपल्या शस्त्रागारात असली पाहिजेत अशी खुणगाठ मनाशी बांधली आणि तेव्हापासून संशोधन सुरू केले. ते आता फलदायी झाले आहे.  आता तयार झालेल्या ढालीने भारतावर हल्ला करणारी २००० किलो मीटर पल्ल्याची क्षेपणास्त्रे नष्ट करणे शक्य होणार आहे.

Leave a Comment