
नवी दिल्ली, दि. ८ – एअर इंडियाच्या सुमारे १०० वैमानिक आजारपणाचे कारण देवून अचानकपणे संपावर गेल्याने एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेला चांगलाच फटका बसला आहे. वैमानिक रजेवर गेल्याने एअर इंडियाची काही विमाने रद्द करावी लागली. एअर इंडियाच्या ताफ्यातील आणखी १५० वैमानिक आजारपणाच्या रजेवर जाण्याची शक्यता असून त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैमानिकांच्या या आंदोलनाबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कठोर भूमिका घेतली असून वैमानिकांचा संप चालूच राहिल्यास आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात येतील. तसेच आंदोलन करणार्या वैमानिकांविरूद्ध कठोर कारवाई कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. वैमानिकांचे आंदोलन लक्षात घेवून एअर इंडियाने १० वैमानिकांना बडतर्फ केले आहे. तसेच या वैमानिकांच्या इंडियन पायलट्स गिल्ड या संघटनेची मान्यताही रद्द करण्यात आली असून सदर संघटनेच्या कार्यालयांना सील ठोकले आहे.
एअर इंडियाच्या वैमानिकांनी पुकारलेल्या या असहकारामुळे पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली असून त्यात दिल्ली-शिकागो, मुंबई-न्यू जर्सी, दिल्ली-टोरंटो आणि दिल्ली-हॉंगकॉंग या उड्डाणांचा समावेश आहे. या विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे शेकडो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर एअर इंडियाच्या विमानांनी प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी पोहोचले होते. पंरतु त्यांना विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्यासंबंधी वा ती विमाने केव्हा जाणार आहेत, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध न झाल्याने त्या प्रवाशांचे हाल झाले.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्री अजित सिंह यांनी एअर इंडियाच्या वैमानिकांनी पुकारलेले रजा आंदोलन बेकायदेशीर घोषित केले आहे. या संपासंदर्भात वैमानिकांनी आगाऊ नोटीस देणे आवश्यक होते, पण त्यांच्याकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नाही. एअर इंडियाची सध्याची बिकट अवस्था वैमानिकांनी लक्षात घ्यायला हवी होती. चर्चेद्वारे त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा निघू शकतो. त्यासाठी अशाप्राकारे आंदोलन करण्याची गरज नव्हती, असे अजित सिंह म्हणाले
बोईंग-७८७ या विमानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी इंडियन एअर लाइन्सच्या वैमानिकांना पाठविण्यास एअर इंडियाच्या इंडियन पायलट्स गिल्ड या संघटनेचा तीव्र
विरोध आहे. या विषयावर एअर इंडियाचे व्यवस्थापन, नागरी विमान वाहतूक खाते यांच्या समवेतची बोलणी फिस्कटल्यानंतर एअर इंडियाच्या वैमानिकांनी आंदोलन पुकारून विमान प्रवाशांना वेठीस धरले आहे.
