
पिंपरी, दि. ७ – पिंपरी-चिंचवड शहरात दिनांक १२ जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा दुसरा गोल रिंगण सोहळा होणार आहे. या सोहळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर मोहिनी लांडे यांनी पत्रकारांना सांगितले.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शहरात ११ जून रोजी आगमन होणार आहे. या पालखीचे स्वागत करण्याच्या दृष्टीने तसेच महापालिकेच्यावतीने वारकर्यांसाठी देण्यात येणार्या सुविधांसंदर्भात चर्चा करण्यासाठी महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीला उपमहापौर राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम, स्थायी समिती अध्यक्ष जगदीश शेट्टी, पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते कैलास कदम, क्रीडा समिती सभापती वनिता थोरात, महिला व बालकल्याण समिती सभापती भारती फरांदे आदी उपस्थित होते.