राष्ट्रपतींच्या घराचा नक्की पत्ता काय?

नवी दिल्ली दि.८- निवृत्तीनंतर कुठे राहायचे याचा अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पत्रकरांना सांगितले. सेशेल्सच्या दौर्‍यावरून परतताना विमानातच त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
 पुण्यात राहण्याच्या निर्णय घेतलेल्या राष्ट्रपतीं प्रतिभाताई पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानावरून झालेले वाद देशभरात गाजले आणि त्याच्यावर सर्व थरांतून प्रतिक्रीयाही उमटल्या होत्या. पुण्यातील जागेवर बांधकामही सुरू झाले होते मात्र ही जागा लष्कराची असून ती जवान आणि शहीदांच्या विधवांसाठी राखीव असल्याचा पवित्रा घेऊन पुण्यात निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी मोठे आंदोलनच सुरू केले होते. पुण्यातील अनेक मान्यवरांनीही राष्ट्रपतींना ही जागा नाकारावी अशी विनंती केली होती. त्यातच राष्ट्रपतींना नियमापेक्षा कितीतरी अधिक जागा दिली गेल्याचा आरोप केला जात होता.अखेर राष्ट्रपतींनी पुण्यातील ही जागा नाकारत असल्याचे सरकारला कळविले होते.
  जुलैमध्ये राष्ट्रपतींची मुदत संपत आहे मात्र त्या त्यानंतर कुठे राहणार, त्यांचा पत्ता काय असेल याबाबत अद्यापी कांहीच निर्णय घेतला गेलेला नाही.

Leave a Comment