भारताला यंदा अपेक्षित निर्यातीचे उदिष्ट्य गाठणे अवघड

नवी दिल्ली दि.८- युरो झोन समस्या अधिक तीव्र बनली असल्याने भारताला यंदा आपल्या निर्यातीत वाढ करणे अशक्य आहेच पण गतवर्षीइतकी निर्यात राखणेही अवघड बनेल असे मत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑरगनायझेशनचे अध्यक्ष रफिक अहमद यांनी व्यक्त केले आहे.
  यंदाच्या वर्षात निर्यात वाढ २१ टक्क्यांवर नेण्याचे उदिष्ट्य भारताने नजरेसमोर ठेवले होते. मात्र यंदाच्या आर्थिक वर्षात ही वाढ गाठणे अशक्य असल्याचे सांगतानाच अहमद म्हणाले की आपण ३५० बिलीयन डॉलर्स निर्यातीचा पल्ला गाठू शकणार नाही अशीच शक्यता अधिक आहे. सरकारने २०१४-१५ सालासाठी हेच उदिष्ट्य ५०० बिलीयन डॉलर्स ठरविले आहे. मात्र सध्या जी जागतिक आव्हाने उभी राहात आहेत आणि एकूण जागतिक बाजारातील मागणीच घटली आहे, त्यातच युरो क्रायसिसमुळे परिस्थिती अवघड बनली आहे. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील निर्यातीतही कांही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे तेथील निर्यातही कमी होत आहे. परिणामी चालू आर्थिक वर्षात निर्यातीचे चित्र निराशाजनक असेल असा अंदाज आहे. अगदी १५ ते १६ टक्के निर्यात वाढ हेही मोठे आव्हान ठरू शकणार आहे.
    भारताने २०११-१२ सालात २१ टक्के निर्यात वाढ नोंदवून ३०३.७ बिलीयन डॉलर्स किंमतीचा माल निर्यात केला होता.त्यात लॅटिन अमेरिका व आफ्रिकेतील निर्यातीचा वाटा १२ टक्के होता. पहिल्या सहामाहीतच पाच ते सहा टक्के वाढ नोंदविली गेली होती. आता आशियाई देश हेच भारताला निर्यातीचे आशास्थान राहिले असून तेथे निर्यातवाढीला मोठी संधी आहे. मात्र रूपयाच्या दरात सतत होत असलेले चढउतार यामुळेही निर्यातदारांना अडचणी येत आहेत. अहमद म्हणाले की चीनी बाजारपेठेवर भारतीय निर्यातदारांनी लक्ष केंद्रीत केले तर निर्यातीतील व्यापारी तूट भरून काढण्यास मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. गेल्या अर्थिक वर्षात १८५ बिलीयन डॉलर्सवर असलेली ही व्यापारी तूट या व्यापारातून कमी करता येईल मात्र त्यासाठी सरकारने मदत करण्याची तयारी दर्शवायला हवी.

Leave a Comment