नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त

काठमांडू, दि. ८ – सुदूर पश्‍चिम क्षेत्राचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाला विरोध म्हणून गेले १२ दिवस चालू असलेले आंदोलन हिंसक रूप धारण करण्याच्या मार्गावर आहे. सुदूर पश्‍चिम भूभागातील कैलाली जिल्ह्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली.  
    नेपाळच्या सशस्त्र दलाच्या केंद्रीय कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, सर्व शस्त्रास्त्रे कैलाली जिल्ह्यातील सुगरखाल ग्रामविकास समितीच्या भालूमारे नदीजवळील एका सुरूंगात लपवण्यात आली होती. सदर शस्त्रास्त्रांमध्ये गोळ्या व काडतुसे यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. यामध्ये ५.५६ एमएम चे १९३७ राऊंड, ९ एमएमचे २८६ राऊंड, ७.६२ एमएमचे ५१९ राऊंड मैग्जीन, इन्सास चे २३ मैग्जीन, ५७ एसएलआर मैग्जिन, एम-१६ चे २७ मैग्जिन, एसएमजीचे ७ मैग्जिन व २२ काडतुसांचा समावेश आहे.
    गुप्तचर यंत्रणेद्वारा मिळालेल्या माहितीच्या आधारे एपीएफने घातलेल्या धाडीत सदर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. ही शस्त्रास्त्रे कोणाच्या दृष्टीस पडू नयेत यासाठी सुरूंगवर मोठमोठे दगड ठेवून ते झाकण्याचा प्रयत्न केला गेला होता.
    दरम्यान, पोलिसांनी याआधी देखील भालूमारे नदीजवळ लपवून ठेवण्यात आलेले ११ शक्तिशाली बॉम्ब, विस्फोटके जप्त केले होते.

Leave a Comment