
औरंगाबाद, दि. ८ – औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणार्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने; तसेच पाणीपुरवठा योजनेच्या विंधन विहीरीत गवत वाढल्याने वहन क्षमतेवर परिणाम झाल्यामुळे पाणीकपात करण्याची वेळ औरंगाबाद महापालिकेवर येणार असे दिसते आहे. आता शहरात एकदिवसाआड पाणी येत आहे, त्यात आणखी कपात केल्यास शहरात पाणीसमस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते. धरणात सध्या २०६.०९ दशलक्ष घन मीटर इतका जिवंत पाणीसाठा आहे. शहराला एका दिवसाला १२० दशलक्ष लिटर पाणी लागते. मात्र शहराला पाणीपुरवठा करणार्या विंधन विहिरी मृतसाठ्यात असल्याने आणि मृतसाठ्यात भरपूर म्हणजे ९४४ दशलक्ष घन मीटर पाणी असल्याने शहराला पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, असे अधिकारी सांगत आहेत. मात्र गवतामुळे पाणीयोजनेची वहनक्षमता कमी झाल्याने ‘देणार्याचे हात हजारो फुटकी माझी झोळी ’ अशी महापालिकेची अवस्था आहे.