कटासराज मंदिराच्या अवस्थेबद्दल जरदारी यांनी व्यक्त केली चिंता

इस्लामाबाद,  दि. ८ – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सुप्रसिद्ध कटासराज मंदिराच्या अवस्थेबद्दल राष्ट्राध्यक्ष असिफ अली जरदारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. या मंदिराच्या वाईट अवस्थेबद्दल माध्यमांमधून आलेल्या वृत्ताची दखल घेवून या संदर्भातील विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्राध्यक्षांनी अधिकारी वर्गास दिले आहेत. पाकिस्तानातील सर्व धर्मांशी संबंधित प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू आमच्या संस्कृतीचा एक भाग असून त्यांचे संरक्षण करण्याची तसेच या चांगल्या स्थितीत ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
    राष्ट्राध्यक्ष जरदारी यांचे प्रवक्ते फरहतुल्ला यांनी सांगितले की, कटासराज मंदिराच्या आजुबाजूच्या परिसरात असलेल्या औद्योगिक प्रकल्पांमुळे या मंदिराच्या सौंदर्यास बाधा पोहोचत आहे. तसेच या मंदिर परिसरात असलेल्या तलावातील पाणीही आटू लागले आहे, असे वृत्त माध्यमांमधून प्रकाशित झाले आहे. हे वृत्त लक्षात घेवून पाकिस्तानातील विद्यमान ऐतिहासिक धार्मिक स्थळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या स्थितीत ठेवण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.
    माध्यमांनी अलिकडेच दिलेल्या वृत्तांमध्ये, कटासराज मंदिराच्या परिसरात असलेल्या सिमेंट कारखान्याकडून भूजलाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने मंदिर परिसरातील श्री अमरकुंड कोरडे पडू लागले आहे. कटासराज मंदिर परिसरातील तलाव हजारो वर्षांपासून अस्तित्वात असून जगभरातील लोकांना या तलावाचे आकर्षण आहे. या तलावातील पाणी आजुबाजूच्या अनेक गावांमध्ये जाते, अशी माहिती प्रवक्त्याने दिली.

Leave a Comment