आमिरचा ’सत्यमेव जयते’ वादात

सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याच्या ’सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचा एक भाग दाखवून झाला नाही तोच, हा कार्यक्रम वादात सापडला आहे. ’बॅण्ड युफोरिया’चे प्रमुख गायक पलाश सेन याने ’सत्यमेव जयते’च्या टायटल साँगच्या कॉपीराईट हक्कांसंदर्भात तक्रार केली आहे.

पलाशने या संदर्भात बोलताना सांगितले की, या कार्यक्रमाचा ट्रेलर आणि थीम साँग काही दिवसांपासून दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित होत आहे. पण आपण आतापर्यंत ते पाहिले नव्हते. परंतु जेव्हा आपण सदर गीत ऐकले, ते ऐकून आपणास धक्काच बसला. २००० मध्ये युफोरियाने ’धूम’ नावाचा आपला एक अल्बम प्रसिद्ध केला होता.

त्यातील एका गीताचे नाव ’सत्यमेव जयते’ असे होते. या गीताचे संयोजक राम संपत यांनी जे ’सत्यमेव जयते’चे जे समूहगीत सादर केले आहे, ते गीत आमच्या गीताशी अगदी मिळतेजुळते आहे. या समूहगीतात आमच्याच गीतातील शब्द आढळून येतात. मात्र या गीतातील अन्य शब्द आणि लय आमच्या गीतापेक्षा वेगळे आहे, हे आपण मान्य करतो. या गीतातील साधर्म्य लक्षात घेवूनच आम्ही संबंधितांना नोटीस पाठविली आहे. दरम्यान, राम संपत यांनी या संदर्भात काही भाष्य करण्यास नकार दिला.

अभिनेता आमिर खान यांचा ’सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम रविवारपासून दाखविण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्याच कार्यक्रमात ’स्त्री-भ्रूण हत्या’ हा विषय घेवून त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले आहे.

Leave a Comment