
वॉशिंग्टन दि.६- राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसर्या टर्मसाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना इंडियन अमेरिकन नागरिकांनी प्रचंड प्रमाणावर पसंती दर्शविली असल्याचे दिसून आले आहे. आपल्या निवडणूक प्रचारासाठी ओबामांनी ओहियो आणि व्हर्जिनियात घेतलेल्या दोन सभांमधून ८५ टकके इंडो अमेरिकन नागरिकांनी ओबामांना पसंती दर्शविली असल्याचे सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. लेक रिसर्च पार्टनर्स या राजकीय सल्लागार फर्मने हे नवे सर्वेक्षण हाती घेतले आहे.
या फर्मच्या एशियन अमेरिकन पॅसिफिक आयलंडर विभागाचे प्रमुख टोबी चौधरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मिट रोमनी यांच्या तुलनेत ओबामा इंडो अमेरिकन नागरिकांत अधिक प्रभावी ठरले आहेत. ओबामा ७६ तर रोमनी ८ टक्के असे त्याचे प्रमाण आहे. फिलिपिनो अमेरिकन मध्ये हेच प्रमाण ५७ व २० टक्के असे आहे तर चीनी अमेरिकनमध्ये हे प्रमाण ६८ व ८ टक्के आहे.सर्व एशियन अमेरिकन नागरिकांत ओबामांनाच सर्वाधिक पसंती देणार्यांत इंडो अमेरिकन नागरिकांची संख्या जास्त आहे.