उद्योगक्षेत्राला होणार्‍या कर्ज पुरवठ्यात घसरण

मुंबई, दि. २ – कडक पतधोरणामुळे महागलेली कर्जे व बाजारात खेळत्या पैशांची निर्माण झालेली टंचाई यामुळे उद्योगक्षेत्राला होणार्‍या कर्ज पुरवठ्यात घसरण झाली. २०११-१२ या आर्थिक वर्षात बँकांनी उद्योगांना केलेल्या पतपुरवठ्यात केवळ २१ टक्क्यांचीच वाढ झाली. गेल्या वर्षी उद्योगांचा पतपुरवठा २३.६ टक्क्यांनी वाढला होता.
    रिझर्व्ह बँकेच्या २३ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, बँकांनी उद्योगांना १९ लाख ६५ हजार ८७० कोटी रूपयांचा पतपुरवठा केला. यात पायाभूत सुविधा, धातू व धातू उत्पादने, अभियांत्रिकी अन्न प्रक्रिया, उद्योग, हिरे व दागिने, वाहन व वाहनांचे सुटे भाग, वाहतूक उपकरणे, खाणकाम या उद्योगांना सर्वाधिक पतपुरवठा झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
    सेवाक्षेत्राच्या पतपुरवठयात केवळ १४.७ टक्क्यांचीच वाढ झाली. गेल्या वर्षी या क्षेत्राने पतपुरवठयात  २३.९ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. अन्न उद्योगाला वगळून बँकांनी केलेल्या पतपुरवठयात १७ टक्क्यांची वाढ झाली, तर गेल्या वर्षी यात २०.६ टक्क्यांची वाढ झाली होती.
    दरम्यान, वैयक्तिक कर्जातील वाढ १७ टक्क्यांवरून १२.१ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. कृषी पतपुरवठयात १०.६ टक्क्यांवरून १३.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. कृषी व कृषीसंबंधित व्यवसायासाठी २०११-१२ मध्ये(२३ मार्चपर्यंत) ५ लाख २२ हजार ६२० कोटी रूपयांचा कर्जपुरवठा झाला. आदल्या वर्षी याच कालावधीत ४ लाख ६० हजार ३३० कोटी रूपयांचा कर्ज पुरवठा झाला होता.

Leave a Comment