महाराष्ट्रासह चार राज्यांत ’हाय अलर्ट’

नवी दिल्ली, दि.५ – केंद्रीय गुप्तचर विभागाने महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणा या चार राज्यांत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गृह मंत्रालयास सादर केला असून तो लक्षात घेवून या चार राज्यांमध्ये ’हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. पंजाब आणि हरियाणात काश्मीरमार्गे; तर गुजरात आणि महाराष्ट्रात सागरी मार्गे असा हल्ला होऊ शकतो, असे या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर तटरक्षक दल; तसेच सीमा सुरक्षा दल यांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, केंद्रीय गुप्तचर विभागाने शनिवारी सकाळी दहशतवादी हल्ल्यासंदर्भात इशारा देतानाच वर उल्लेखित चारही राज्यांच्या पोलीस प्रमुखांकडे ही माहिती पाठविली. त्यानंतर या चारही राज्यांत अत्यंत सावधानतेचा इशारा देण्यात आला.
  हा अहवाल लक्षात घेवून गुजरातमधील अहमदाबाद, जामनगर या शहरांसह अन्यत्र बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अहमदाबाद आणि जामनगर ही दोन शहरे अतिरेक्यांचे संभाव्य लक्ष्य असू शकतात, अशी माहिती गुजरात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.
  गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, ’लष्कर-ए-तय्यबा’च्या अतिरेक्यांनी या चार राज्यांतील काही ठिकाणांची पाहणी केली असून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने त्यांची तयारी आहे. जामनगर येथे असलेले तेल शुद्धीकरण प्रकल्प हे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकते. जामनगर पोलिसांनी संबंधीत अहवाल लक्षात घेवून नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि रिलायन्स व इस्सार यांच्या सुरक्षा यंत्रणेला सतर्क केले आहे.

 पंजाबमधील भटिंडा येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पाची सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडक करण्यात आली आहे.