चेन्नई, दि.५ – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यापेक्षा आपल्याला राहुल द्रविड अधिक आवडतो, असे मत ऑस्ट्रेलिया फलंदाज माइक हसी याने व्यक्त केले आहे. ’द वॉल’ याचा खेळाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असून त्यामुळे त्याचा खेळ सरस ठरतो, असे मत त्याने व्यक्त केले.
एका कार्यक्रमात बोलताना हसी म्हणाला की, सचिन हा निश्चितच महान खेळाडू आहे. पण द्रविडची खेळीच अशी आहे की तो एकदम भावून जातो. द्रविडची हार न मानण्याची वृत्ती, त्याची हिंमत, त्याच्यातील दृढता या गुणांमुळे तो इतरांपेक्षा नक्कीच उजवा ठरतो.
ऑस्ट्रेलियाच्या अलीकडील दौर्यात राहुल द्रविडची कामगिरी असमाधानकारक झाली असली तरी त्यामुळे द्रविडच्या कारकीर्दीस कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचत नाही, असे मत व्यक्त करून हसी म्हणाला की, द्रविडने अनेक वर्षांपर्यंत उत्तम खेळी खेळली आहे. आपल्या बॅटीची तडफदार चमक त्याने दाखविली आहे. तसेच मैदानावर व मैदानाबाहेर आपल्या नम्र स्वभावामुळे तो सर्वांना आपलासा वाटत आहे. कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावा काढणार्या खेळाडूंमध्ये राहुल द्रविड तिसर्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडची क्षमता आणि क्रिकेटकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन लक्षात घेता एखादा खेळाडू उच्च शिखरावर राहो अथवा न राहो, तो आपल्या क्षमतेच्या बळावर इतरांपेक्षा खूपच पुढे असतो.
भारताकडे अत्यंत चांगले खेळाडू असले तरी टीम इंडियासाठी राहुल द्रविडसारखा खेळाडू मिळणे अशक्य वाटते. भारताकडे चांगल्या क्रिकेट खेळाडूंची उणीव नाही. विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा यांसारखे तरूण खेळाडू टीम इंडियाकडे आहेत, पण द्रविडसारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही हेही तितकेच सत्य आहे, असे मत माइक हसी याने व्यक्त केले.