पॉलिसी रेट रिव्हर्सलमुळे भारतात गुंतवणूक वाढण्याची शक्यता

मनिला दि.५- पॉलिसी रेट रिव्हर्सलमुळे भारतात गुंतवणूक वाढण्याची तसेच उद्योगांना अधिक चालना मिळण्याचीच शक्यता अधिक आहे असे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. मनिला परिषदेत एशियन डेव्हलपमेंट बँक बोर्ड ऑफ गव्हर्नरचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
  मुखर्जी म्हणाले की भारतीय नाणेनिधी अॅथॉरिटीने तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच पॉलिसी रेटचा फेरविचार केला आहे. १७ एप्रिल २०१२ ला तशी घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याचा विपरित परिणाम होणार नसून उलट गुंतवणूक वाढण्याची तसेच उद्योगांना चालना मिळण्याचीच शक्यता अधिक आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणांना अनुकुल ठरतील असेच निर्णय घेण्याकडे सरकारचा कल असून २०१२-१३ च्या वर्षात जीडीपीच्या दोन टक्के इतकेच सबसिडीचे प्रमाण ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अर्थसंकल्पिय तूट कमी करण्यासाठी अनेक योजना विचाराधीन आहेत. त्यात कॅपिटल मार्केट लिबरायझेशन, कपिटल फ्लो वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांचा समावेश आहे.
  भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे. येत्या कांही वर्षातच आम्ही २००८ सालाच्या पूर्वी असलेला विकासदर पुन्हा गाठू. अन्य देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था लवचिक आहे आणि त्यामुळेच गेल्या जागतिक आर्थिक मंदीतही आम्ही तरून गेलो तसेच पुन्हा जे जागतिक आर्थिक मंदीचे संकट घोंघावते आहे, त्यालाही यशस्वीपणे तोंड देऊ. या विश्वासामागचे मुख्य कारण म्हणजे भारताचा जीडीपी हा स्थानिक मागणीवर अधिक अवलंबून आहे असेही मुखर्जी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment