सिनेरसिकांना उत्सुकता `काकस्पर्श’ आणि `जन्नत – २’ चित्रपटांची

मुंबई, दि. ३ – या आठवडयात प्रदर्शित होणार्‍या `जन्नत – २’ या हिंदी आणि `काकस्पर्श’ या मराठी चित्रपटांबाबत सिनेरसिकांमध्ये औत्युक्याचे वातावरण आहे.
    `जन्नत’ हा हिंदी चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यातील अभिनेत्री सोनल चौहानच्या अभिनयामुळे आणि पटकथेमुळे हा चित्रपट कमालीचा गाजला होता.  याच चित्रपटाचा सिक्वल असलेल्या `जन्नत – २’ चे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक कुणाल देशमुख याने केले आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी, रणदीप हुडा आणि किंगफिशर कॅलेंडरवरील बोल्ड छायाचित्रामुळे चर्चेत आलेली ईशा गुप्ता यांची प्रमुख भूमिका असेल. चित्रपट नायक ते दिग्दर्शक असा प्रवास असलेला रजत कपूरचा फ्याटसो हा सिनेमा देखील या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. कॉमेडी आणि रोमान्स यांच्यावर भर असलेल्या या चित्रपटात रणवीर शौरी, पूरब कोहली आणि गुल पनंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
    या आठवडयात एकमेव मराठी सिनेमा प्रदर्शित होत असून, नवनवे विषय हाताळण्यासाठी प्रसिद्ध असलेला निर्मात-दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकर आता `काकस्पर्श’ हा एका विलक्षण प्रेमकथेवर आधारीत चित्रपट घेऊन मराठी रसिकांच्या भेटीस येत आहे. १९३०-५० या दशकांमधील ब्रिटीशांचा सत्ताकाळ, तत्कालीन समाजातील अनिष्ट रुढी – परंपरांच्या विळख्यात जखडलेला समाज यातून उलगडणारी एक प्रेमकथा काकस्पर्शमधून साकारण्यात आली आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, प्रिया बापट, शाळा चित्रपटामुळे चर्चेत आलेली केतकी माटेगावकर, वैभव मांगले आणि अभिजीत केळकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Leave a Comment