विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुन्हा दोस्ती

मुंबई, दि. ३ – विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणार्‍या आगामी निवडणुकीमध्ये सध्याची सारी कटुता विसरून आघाडी करण्याचा निर्णय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेतून जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांचे बंधु अनिल तटकरे आणि कोकण पदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे चिरंजीव निरंजन यांची उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर केली.
    कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यात गुरूवारी झालेल्या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, मनसे यांची साथ घेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने परस्परांवर कुरघोडी केली होती. ही सारी कटुता विसरून विधानपरिषदेची आघाडी करण्यास दोन्ही पक्ष सज्ज झाले आहेत. मात्र, दोन्ही पक्षांकडे आवश्यक मतांचा कोटा नसल्याने पराभवाची भीती वाटत असल्याचे कॉंग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
    गेल्या आठवडयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव ठाकरे यांनी यासंदर्भात चर्चा केली होती. गुरूवारी माणिकराव ठाकरे आणि मधुकर पिचड यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदांमधून एकत्र लढण्याची घोषणा केली.
    येत्या ३० मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणार्‍या विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी मतदान होणार आहे. यातील कोकण, नाशिक व परभणी या जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवणार आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, लातूर आणि उस्मानाबाद या जागा कॉंग्रेस लढविणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहीर केली असली आणि मुंबई पदवीधर तसेच नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघाबाबत लवकरच निर्णय घेवू असे सांगण्यात येते. मात्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या चार जागांबाबत निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले.

Leave a Comment