जागतिक बाजारात साखरेचे दर कोसळले- भारतीय उत्पादक अडचणीत

नवी दिल्ली दि.४- जगातील पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाचे साखर उत्पादक देश ब्राझील आणि भारत यांनी  साखर निर्यातीचे धोरण जाहीर केल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या साखरचे दर एकदम कोसळले असून वर्षभरातील सर्वात कमी भावावर साखर आली आहे.ही घट ११ टक्के इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
   ब्राझीलमधील साखर उत्पादनाचा हंगाम आत्ता सुरू होत आहे तर भारतातील गळीत हंगाम संपत आला आहे. ब्राझील जगातील नं १ चा साखर उत्पादक देश आहे तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारतात यंदा गतवर्षीच्या तुलनेत चार दशलक्ष टन साखर उत्पादन अधिक झाले आहे. भारतात स्थानिक बाजारात साखरेला उठाव नसल्याने साखर निर्यातीची परवानगी उत्पादक कारखान्यांना देण्यात आली असली तरी जागतिक बाजारातही साखरचे दर घसरले असल्याने साखर उत्पादकांना त्यापासून फायदा मिळण्याची शक्यता नगण्य असल्याचे तज्ञ सांगत आहेत.
  न्यू यॉर्क बाजारात ११ नंबरची कच्ची साखर जी जुलै १२ मध्ये प्रत्यक्षात मिळणार आहे त्याचे दर आत्ताच दर पौंडाला २२.६५ सेंटवर आले आहेत. वॉशिग्टनने स्वीटनरची आयात या अगोदरच वाढविल्यामुळे अमेरिकेत साखरचे दर यापूर्वीच सहा टक्के घसरले आहेत. उन्हाळ्यासाठी यापुढे आणखी आयात करावी लागेल का याबाबत आत्ताच निश्चित कांही सांगता येणार नाही असे यूएसमधील सर्वात मोठे वितरक डोमिनो फूडनेही जाहीर केले आहे. परिणामी भारतीय साखरेला अमेरिकेत कितपत मागणी येईल याची शंकाच आहे.
  लंडनमध्ये वापरली जाणारी व आयात केली जाणारी पांढरी रिफाईंड शुगर नं५ चे भाव आत्ताच टनाला ५५९.८० डॉलर्सवर आले असताना भारताने साखर निर्यातीवरील नियंत्रणे उठविल्याने साखरेच्या जागतिक दरांवरही दबाव निर्माण झाला आहे. अर्थात देशांतर्गत पुरवठा अनियमित झाल्यास भारत निर्यातीवर पुन्हा बंधने घालू शकतो.
  इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार या वर्षात महाराष्ट्रात ८.८ दशलक्ष टन, उ.प्रदेशात ६.९ तर कर्नाटकात ३.७ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले असून या वर्षात २६ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले आहे जे गतवर्षापेक्षा ४ दशलक्ष टनाने अधिक आहे. त्यातच उ.प्र, तमीळनाडू, म.प्रदेश, महाराष्ट्र , कर्नाटक, बिहार,आसाम, आंध्र, पंजाब, उत्तराखंड या राज्यातील ऊस लागवडीखालचे क्षेत्र यंदा वाढले आहे. म्हणजेच साखर उत्पादनही वाढणार आहे. योग्य दर न मिळाल्यास साखर उद्योग चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment