आमीरच्या पहिल्यावहिल्या टिव्ही शोला कन्नडीगे मुकणार

 आमीरचा पहिलावहिला रिअॅलिटी शो सत्यमेव जयते याच्या प्रसारणासाठी सर्व जगातील प्रेक्षक उत्सुक झाले असतानाच कर्नाटकातील प्रेक्षकांना मात्र या शोला मुकावे लागणार आहे.
  कर्नाटकात स्थानिक फिल्म आणि टिव्ही उद्योगाने आपापसात संगनमताने एक अघोषित निर्णय पूर्वीच घेतला असून त्यानुसार कानडी चित्रपटांचे अन्य भाषांत डबिंग करण्यासाठी परवानगी आहे मात्र अन्य भाषांतील चित्रपट अथवा टिव्ही शोचे कानडीत डबिंग करायला परवानगी नाही. मग भले तो हॅरी पॉटर असो वा सत्यमेव जयते असो. प्रेक्षकांनी या संदर्भात न्यायालयात धाव घेतली तर ही बंदी टिकणार नाही याची या लोकांनाही कल्पना आहे मात्र तरीही या बंदीवर कन्नडीगे ठाम आहेत.
  कन्नड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी चे चेअरमन यासंदर्भात म्हणाले की आमच्या राज्यातील ३० जिल्ह्यापैकी १९ जिल्ह्यात मातृभाषेचे महत्त्व कमी होत असल्याचे आम्हाला आढळले आहे. आमची भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी आणि त्यावर होत असलेले अन्य भाषांचे आक्रमण रोखण्यासाठी आम्हाला कांही कडक नियम करणे भाग आहे आणि त्यामुळेच ही बंदी घालण्यात आली आहे.
  स्टार सुवर्ण चॅनेलचे प्रमुख अनुप चंद्रशेखर म्हणाले की ही बंदी आम्हाला मान्य आहे पण शैक्षणिक कार्यक्रमांना त्यातून सवलत दिली जायला हवी. प्रेक्षकही या बंदीवर नाराज आहेत. सर्व भाषांतील कार्यक्रम प्रसारित व्हायला हवेत तरच आम्ही देशाच्या अन्य भागाच्या प्रांतातील लोकांशी म्हणजे आमच्या देशबांधवांशी जुळले जाऊ असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment