अंध वकील चेंगबाबत चीन अमेरिकेत समझोता

बिजिंग दि.३- सरकारविरोधात कारवाया केल्याबद्दल तब्बल १९ महिने स्थानबद्धतेत असलेल्या आणि त्यातून निसटून गेले सहा दिवस अमेरिकन दूतावासात आश्रय घेतलेल्या अंध वकील गुआंग चेंग याला देशातच सुरक्षित राहू देण्यासाठी अमेरिकेने केलेल्या वकीलीला चीनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चेंग यांना देशातच सुरक्षितरित्या राहू द्यावे आणि त्यांच्या गुन्ह्यांबद्दल त्यांना शिक्षा केली जाऊ नये यासाठी अमेरिकेच्या सेक्रेटरी हिलरी क्लिंटन बुधवारी बिजिंग येथे दाखल झाल्या होत्या. त्यांच्या विनंतीला चीनने सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी चेंगला अमेरिकेन दूतावासाने मदत केल्याबद्दल अमेरिकेने चीनची माफी मागावी असा स्पष्ट इशाराही दिला आहे.
    सरकार विरोधी कारवायांबद्दल ४१ वर्षीय अंध वकील चेंग याला चीनने त्याच्याच घरात स्थानबद्ध केले होते. या घटनेला १९ महिने उलटल्यानंतर चेंग यांनी स्थानबद्धतेतून निसटून अमेरिकन दूतावासात सहा दिवसांपूर्वी आश्रय घेतला होता. मात्र चीनने अमेरिकेची ही पद्धत चीनच्या अंतर्गत कारभारातील ढवळाढवळ आहे आणि ती चीनला अजिबात मान्य नाही असे ठणकावले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेने या कृत्याबद्दल माफी मागावी अशी मागणीच केली असून पुन्हा या प्रकारचे कृत्य अमेरिका करणार नाही याची खात्री द्यावी अशीही मागणी केली आहे.
  चेंगच्या सुटकेच्या मागणीबाबत प्रथमच चीन सरकारने आपले मौन सोडले आहे. अमेरिकेतही राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे जनतेने चेंगला अमेरिकेने आश्रय द्यावा असा आग्रह धरला होता. मात्र हा आग्रह नाकारून चेंग यांना देशातच सुरक्षा देण्यास चीनने मान्यता दर्शविली आहे. चेंग यांनी आपली सुटका झाल्याबद्दल क्लिंटन यांचे फोनवरून आभार मानले असून मी तुमचे चुंबन घेऊ इच्छितो अशी भावनाही व्यक्त केली आहे. अमेरिकन दूतावासातून बाहेर पडल्यावर चेंग यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचेही समजते.

Leave a Comment