
नवी दिल्ली दि.२- सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रिमियर लिग स्पर्धेत भारताचे ओपनिंग बॅटसमन विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ज्या रितीने परफॉर्मन्स देत आहेत, ते पाहता भारताचा कप्तान महेंद्रसिग धोनी याच्या पुढे त्यांच्या रूपाने मोठे आव्हानच उभे राहिले आहे असे म्हटले तर गैर ठरू नये.
ओपनिंग बॅटसमन म्हणून या दोघांनी नेहमीच चांगला खेळ केला आहे. मात्र सध्याचा त्यांचा खेळ आणखीनच वेगळ्या पातळीवर गेला असल्याचे दिसून येत आहे.जणू या स्पर्धांचा वापर दोघेही भारतीय क्रिकेट संघाच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी दावा करण्यासाठीच करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कप्तान सेहवाग याने सलग पाच अर्धशतके नोंदवून टी २० क्रिकेटमध्ये विक्रम नोंदविला आहे. १० मॅचमध्ये ४९.४४च्या सरासरीने त्याने ४४५ रन्स कुटल्या आहेत तर कोलकाता नाइट रायडर्सचा कप्तान गंभीरने ४५.६२ च्या सरासरीने ३६५ धावा काढल्या आहेत. त्यात त्यानेही चार अर्धशतके केली आहेत. अजून या स्पर्धांतील निम्मे सामने बाकी आहेत आणि सध्याच हे दोघेही टॉप टू चे स्थान पटकावून बसले आहेत.