राष्ट्रपतीपदाची होड

    राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची या पदाची मुदत संपत आलेली आहे आणि आगामी दोन महिन्यात नवीन राष्ट्रपतींची निवडणूक होणे आवश्यक ठरलेले आहे. ही निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे या संबंधातले राजकारण गती घ्यायला लागले आहे. या राजकारणाला गती येण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे कॉंग्रेसची हतबलता. कॉंग्रेस हा केंद्रातला सत्ताधारी पक्ष आहे. परंतु मुळात केंद्रातच त्याच्या हातामध्ये निर्विवाद बहुमत नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्ष म्हणून आपल्या पसंतीचा उमेदवार राष्ट्रपती व्हावा, असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत असले तरी त्यांच्या हातात तेवढे बहुमत नाही आणि बहुमत नसताना सुद्धा आपल्याच पसंतीचा राष्ट्रपती व्हावा, यासाठी कॉंग्रेसचे नेते धडपड करत आहेत आणि अन्य पक्षांच्या नेत्यांची मने त्यासाठी वळवत आहेत. या सगळ्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचे नाव मात्र मागे पडलेले आहे. सध्या पंजाबचे राज्यपाल असलेले शिवराज पाटील यांचे नाव या स्पर्धेत कुठेही घेतले जात नाही. अन्यथा २००७ साली त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. ऐनवेळी डाव्या आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला, त्यामुळे त्यांची संधी गेली.
    महाराष्ट्रातले दुसरे त्यावेळी चर्चेला आलेले नाव म्हणजे सुशीलकुमार शिंदे. एक वेळा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ते उतरलेही होते. परंतु त्यावेळी केंद्रात भाजपा प्रणित रा.लो. आघाडीचे सरकार असल्यामुळे शिंदे यांना त्यावेळी यश मिळाले नाही. त्यांच्याऐवजी भैरवसिंग शेखावत निवडून आले. त्यावेळी त्यांना हरणार्‍या लढाईत उतरवले गेले होते, ते २००२ साल होते. पण २००७ साली कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली होती. तेव्हा शिंदे यांना या जिंकणार्‍या लढाईत उतरवावे असे सोनिया गांधी यांचे मत होते आणि त्यांनी शिंदे यांचे नाव पुढे केलेही होते. परंतु मायावती यांनी त्याला मोडता घातला. शिंदे यांच्यासारखा दलित उमेदवार कॉंग्रेसच्या सूचनेमुळे राष्ट्रपती झाला तर दलितांची सहानुभूती कॉंग्रेसकडे वळेल आणि आपला हा हक्काचा मतदार आपल्या हातून निसटेल या भीतीने त्यांना ग्रासले. त्यावेळी राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मायावती यांचा पाठींबा निर्णायक होता, त्यामुळे त्यांचे मत ग्राह्य मानावे लागले आणि शिंदे यांचा पत्ता कटला. दोन मराठी उमेदवार बाद झाले तरी शेवटी तिसरा मराठी उमेदवारच विजयी झाला आणि प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या.
    आता त्यांची मुदत संपत आली असताना नव्या नावांचा शोध सुरू झाला आहे. त्यामधून महाराष्ट्राचे शिवराज पाटील आणि सुशीलकुमार शिंदे ही दोन नावे पूर्णपणे बाद झालेली आहेत. आता नव्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, विद्यमान उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रणव मुखर्जी या चौघांची नावे जोरकसपणे पुढे आलेली आहेत. यामध्ये तीन नावे मुस्लीम उमेदवारांची आहेत. हे तिघेही राष्ट्रपती होण्यास अपात्र आहेत असे काही नाही. तिघेही चांगले आहेत आणि राष्ट्रपतीपदाला न्याय सुद्धा देतील. परंतु त्यांच्या उंचीची, क्षमतेची माणसे भारतात नाहीतच असे काही नाही. परंतु ती नावे मागे पडून तीन मुस्लीम नावांची चर्चा होते ही भारताच्या जातीयवादी राजकारणाची शोकांतिका आहे. या तिघांच्या नावाची सूचना ते या पदाला पात्र आहेत या कारणाशिवाय ते मुस्लीम आहेत याच कारणाने प्राधान्याने झालेली आहेत, हे कोणीच नाकारू शकणार नाही. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुस्लीम उमेदवाराला पाठींबा दिला की, देशातल्या मुस्लीम मतदारांमध्ये आपल्याविषयी सहानुभूती निर्माण होईल या अपेक्षेने हे सारे राजकीय पक्ष मुस्लीम उमेदवारांच्या नावाचा आग्रह धरत आहेत. त्यात सुद्धा काही फरक आहेत.
    डॉ. अब्दुल कलाम हे मुस्लीम आहेत ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यांना मुस्लीम समाज फारसा मानत नाही. कारण धार्मिक मुस्लीम नेते नाहीत, ते शास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाच्या सूचनेचा मुस्लीम मतपेढीवर फारसा परिणाम होत नाही. म्हणूनच मुलायमसिंग यादव यांच्यासारखे मुस्लीम मतासाठी जीव टाकणारे नेते सुद्धा अब्दुल कलाम यांच्या नावाच्या बाबतीत, ते मुस्लीम असूनही फार आग्रही नाहीत. दुसर्‍या बाजूला कॉंग्रेसचा जोर प्रणव मुखर्जी या नावावर आहे. कारण त्यांच्या रूपाने एक कॉंग्रेसचा नेता राष्ट्रपती भवनात बसणार असेल तर ते कॉंग्रेसला हवेच आहे. मात्र कॉंग्रेसजवळ बहुमत नाही आणि बहुमतासाठी कॉंग्रेस पक्ष ज्यांच्यावर अवलंबून आहे त्यांना प्रणव मुखर्जी नको आहेत, त्यांना मुस्लीम उमेदवार हवा आहे. असे असले तरी डावी आघाडी मात्र प्रणव मुखर्जी यांच्या बाजूने झुकण्याची शक्यता आहे. यामागचे कारण तसे प्रादेशिक आहे. डाव्या आघाडीला सातत्याने पश्‍चिम बंगालमध्ये यश मिळत गेलेले आहे. त्यामुळे प्रणव मुखर्जी यांना पाठींबा देऊन डाव्या शक्तीला पश्‍चिम बंगालमधील मतदारांची मते आकृष्ट करायची आहेत. त्या कारणामुळे का होईना डावी आघाडी मुखर्जींच्या बाजूला उभी राहिली आहे.

Leave a Comment