पुण्याचा फेरफटका – खाऊ घालणार्‍यांचे काही खास प्रकार

वडापाव,भजीपाव आणि मिसळपाव हे पदार्थ सामान्य माणसाच्या जीवनाचे भाग झाले आहेत.आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर तज्ञ लोक काही निराळे मत व्यक्त करतील पण काम करून श्रमल्या भागलेल्याला दुसरे काही सहजपणे उपलब्ध होत नाही.अशावेळी वडापावच आधाराला असतो. घरून सकाळी जेवण करून निघालेल्या दुपारी केवळ वडापाव यावर भागवायचे असते. आपल्या देशात अशा लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या वीस ते पंचवीस टक्के आहे.

गेल्या पंचवीस वर्षात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अलिकडे शहरे वाढत आहेत व औद्योगिक परिसरही वाढत आहेत. घरून दुपारचा डबा घेअून निघालेल्यांची संख्या जशी असते तशी घरून डबा न घेतलेल्यांचीही संख्या मोठी असते त्याना या वडापावाचाच आधार असतो. मुंबई, पुणे, पिपरी चिचवड, लोणावळा, सातारा शहरात कोठेही रपेट मारली तर अशा वडापाव यांच्या दुकानांची संख्या मोजता येणार नाही येवढी मोठी असते.

तसेच अन्य व्यवसायात जशी एकाच कंपनीची अनेक दुकाने असतात त्याच प्रमाणे वडापावचीही अनेक दुकाने उघडलेल्या काही व्यक्ती व कंपन्या आहेत. असे मोठे व्यवहार आले की, कर चुकवणे हा प्रकारही कोठे कोठे दिसतच असतो.

अशाच एका मोठ्या वडापाव ग्रुपवरील पुण्यातील ही धाड गंमतीशीर होती.आयकर विभागाची धाड नहेमीच विचित्र असते.अधिकारी बर्‍याच मोठया तयारीने येतात. त्यांनी सरळ पहिला प्रश्न टाकला. दररोज ची विक्री किती. मालकाने घोकंपटटीतील उत्तर दिले. त्यावर अधिकार्‍याने तुम्ही बरीच कमी सांगत आहेत, असे सांगून दररोज खपणारे बटाटेवडे पाव, कांदाभजी, चहा यांचे नेमके आकडेच सांगितले. नेमके आकडे ऐकून मालकाची एकदम बोबडी वळली नाही पण बोबडी ती बोबडीच राहिली. ‘‘ कधी कमी जास्त विक्री होते. पण एवढी नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण अधिकार्‍याने गेल्या तीन महिन्याचा बटाटेवडे दररोजचे सुमारे पंचवीस हजार वडा पाव, २० हजार कांदाभजी, दहाहजार गोलभजी नग असा हिशोबच सुनावला.

एवढा नेमका हिशोब मालकानेही आयुष्यात केला नव्हता. एका ठिकाणी तर एवढी विक्री शक्यच नव्हती. याबाबत बोलाचालीही झाली.मग अधिकार्‍यांनी पुराव्याच्या पेट्या आणल्या त्यात तारखा प्रमाणे कांही गठठे दिसत होते. गठ्ठयांचे चार प्रकार होते, त्यातील एक गठठा सोडला तर वर वर तरी बटाटे वड्याचे तेलाने आणि तिखटाने माखलेले कागद दिसत होते. मालकाला वाटले वर असे रद्दीचे कागद आणि खाली हिशोब असतील पण वरून खालपर्यंत तेच कागद होते.

कोणत्या तारखेला २ वडे -२ पाव किती खपले याच्या कागदांचा गठठा आणि अन्य गठठे असा तो हिशोब होता. त्या टपरीवजा पण जरा मोठया दुकानाच्या मालकाला कांही समजेच ना की, हे कागद आयकर खात्यामाफत कसे पोहोचले आणि हे कागद मोजले कोणी?नंतर त्याच्या तक्षात आले की गेले दोन तीन महिने वडा पाव खाल्यानंतर फेकून देण्याच्या भल्या मोठया पाटीतील सारे कागद दोन तीन भिकारी घेउन जात.बाकीच्या भिकार्‍यांना तिकडे फिरकूही देत नसत. त्या मालकाने किती कर चुकवला व किती वसूल झाला हे समजले नाही पण दुसर्‍या दिवशी त्या दुकानात कागदात वडा पाव मिळण्याऐवजी प्लॅस्टिकची थाळी वापरण्यात येउ लागली. कोणी वडापावचे पार्सल मागितले तर त्याच्याकडे आदबीयुक्त भितीने पाहिले जाते.

पुण्यात गेल्या वर्षभरात घडलेल्या वडा-पाव , स्लाईस सॅम्पल, भेळ मिसळ, कचोरी, यांच्याबाबत घडलेल्या कथा मनोरंजक आहेत. त्यातील बरीचशी मनरंजकता वाचण्यासारखी आहे. संबंधित मालकांना त्याचा बराच त्रास झालेला आहे.

पुण्यातील बेडेकर मिसळ, जिमखान्यावरील अप्पांची काकडीची कोशिबीर आणि साबुदाणा खिचडी, श्री उपहारगृहातील घरगुती सँपल, प्रभाविश्रांतीगृहातील वडा आणि कचोरी, अप्पा बळवंत चौकातील कुमार जोशी यांची ओली सुकी भेळ या प्रत्येकाचे खास वैशिष्ठय आहे.बेडेकर मिसळ ही स्वातंत्र्यपूर्व काळातील महिली पेढी.ते महाराष्ट्रातील  खास मिसळीचे आद्यपीठ मानले जायचे. पूर्वी त्यांचे दुकान नारायण गेटाजवळ होते. अलीकडे ते मुंजोबाच्या बोळात शंकराचार्यांच्या पीठाजवळ आहे. तेथे गर्दी एवढी होत असे की बाहेर अर्धा अर्धा तास थोबणारे लोक असत. दुकानात कामगारही १०-१२ होते. दोन माणसांना बसण्याच्या जागेवर तिघे तिघे बसून मिसळ सॅम्पल, स्लाईस यावर यथेच्छ ताव मारला जायचा.

एक दिवस अचानक त्या दुकानाचे रुपच पालटले. एकही कामगार नाही,वर पाटी एकच स्वयंसेवा सुरू आहे. कोणाला कारण कळेना नंतर लक्षात असे आलेकी, कांही कामगार कांही मित्रांना यथेच्छ मिसळ, स्लाईस, सॅम्पल देउन बिल मात्र दोन चहाचे द्यायचे. दुकानात गर्दी असूनही मालकाला कर्ज, हा प्रकार उजेडात आल्यावर मालकाने पाळत ठेवली व एक दिवस ‘सेल्फ सव्र्हिस ’ जाहीर केली. आता कौंटरवर टोकन रिसीट घ्यावी लागते आणि नंतर आपल्या हाताने पाव सॅम्पल मिसळ घेउन खूर्चीकडे यावे लागते. गायकवाड वाडयासमोरील प्रभा विश्रांती गृह अनेकांचे म्हणणे ते केसरी एवढे जुने आहे.कांहींचे म्हणणे ते केसरी दैनिक झाला तेंव्हा पासूनचे आहे. पण तेथील कांही सवयी पेशवायीच्या काळातील असाव्यात .

बटाटेवडे किवा कचोरी याबरोबर कारण्याची चटणी देणारे हॉटेल महाराष्ट्रात  तरी दुसरे नसेल. बटाटे वडयाबरोबर कच्च्यामिरच्या ही पद्धत जुनीच आहे. यामागील गंमत अशी की दररोज किती वडे कचोर्‍या विकायच्या हे तयांचे ठरलेले असते. तेवढे तासात संपले की ते त्या दिवशी पुन्हा मिळत नाहीत. प्रभा विश्रांती गृहा शेजारी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे अलिकडे सवाई गंधर्व महोत्सव होते. गर्दी बरीच होते. पण गर्दी फार होते म्हणून ते दुकान बंदच असते.अप्पा बळवंत चौकात कुमार जोशी यांची ही भेळ तर खासियत आहे. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते कधी तरी येतात. स्वच्छ डब्यातून सारा माल आणलेला ते येईपर्यंत अनेक जण वाट बघत असतात. कुमार जोशी आले की, अधिकाअधिक ३० -४० मिनिटात आणि गर्दी नसेल तर तासात सारी साम्रगी संपते. कुमार जोशी हे सूर्यनमस्काराचे प्रचारक आहेत. दिवसभर ते त्या व्यासंगात असतात, त्या कामाला त्यांनी आपणहुन वाहून घेतलेले आहे. स्वतःची दोनवेळची सोय एवढयाच कल्पनेने ते या व्यवसायाकडे बघतात.

श्री. उपहार गृह हे असेच रुचकर पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. पण संध्याकाळी दोन अडीच तासापेक्षा ते जास्त खुले नसते.वास्तविक आता हॉटेल व्यवसायाचा जमाना बदलला आहे. जुन्या नव्याचासंगम असणारी ही अनेक हॉटेल आहेत. गेल्यावर्षी संस्कृती म्हणुन एक हॉटेल झाले आहे. तेथे भोजनाबरोबर मेंदी, (जेवणानंतर )ज्योतिष सांगणे, चाकावरील मातीची भांडी तयार करायला शिकवणे,व्रतवैकल्याची माहिती, कशिदा , काश्मीरी टाका , स्वेटरच्या अशा अनेक सुविधा उपलब्ध आहे. आता प्रवेश करतानाताच जेवणाबरोबर अन्य दोन बाबीवर ‘टिक ’ करायचे. तीन चार तास वेळ कसा जातो ते समजत नाही.आपापली वैशिष्ठये माणसे कशी जपतात,हीच यातील गंमत…… श्यामला देशपांडे ,पुणे

1 thought on “पुण्याचा फेरफटका – खाऊ घालणार्‍यांचे काही खास प्रकार”

Leave a Comment