कॉंग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी हे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाला जबाबदार नाहीत असा निर्वाळा या पराभवाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ए. के. अँटनी यांच्या समितीने दिला आहे. कॉंग्रेस पक्षातला कारभार सध्या कसा चालला आहे यावर या समितीच्या अहवालाने चांगलाच प्रकाश पडला आहे.
राहुल गांधी यांनी २०१४ सालची लोकसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवून हिंदी भाषी पट्ट्यात जोर लावला आहे. हा पट्टा म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड ही हिंदी भाषक राज्ये. हा पट्टा आपल्या ताब्यात आल्याशिवाय आपल्याला दिल्ली काबीज करता येणार नाही म्हणून राहुल गांधी यांनी या पट्टयावर आपले लक्ष केन्द्रित केले आहे.
या राज्यांची संख्या जवळपास नऊ असली तरीही त्यातली उ.प्र. आणि बिहार ही दोन राज्ये मोक्याची आहेत. पण या दोन्ही राज्यांत कॉंग्रेसचे पानिपत झाले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा राहुल गांधी यांनी वाहिली होती आणि त्यांना या दोन राज्यात अनेक दिवस ठिय्या मारून बसून प्रचार केला होता.
ही सारी राज्ये हिंदी भाषी आहेत पण कॉंग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हाती असलेल्या टॉप फाइव्ह (पंचमहाभूते) नेत्यांना हिंदी भाषाच येत नाही. पंतप्रधान मनमोहनसिंग, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, गृहमंत्री पी.चिदंबरम, संरक्षण मंत्री अँटनी आणि खुद्द सोनिया गांधी या पाच जणांना हिंदीत बोलता येत नाही. मग ज्या हिंदी भाषी पट्ट्यातल्या जनतेला ते आपलेसे करू इच्छित आहेत. त्या जनतेशी कॉंग्रेस पक्ष संपर्क कसा राखू शकणार आहे. तसा तो राहिलेला नाही. त्यामुळे नेते काय म्हणतात ते जनतेला कळत नाही आणि जनता काय म्हणते नेत्यांना कळत नाही.
जनता आणि नेते काय म्हणतात ते कार्यकर्त्यांना कळत नाही. अशा विचित्र वातावरणात तिथे कॉंग्रेस पक्ष सापडला आहे. आता अँटनी समितीने आपला हंगामी अहवाल सादर करून उत्तर प्रदेशातल्या पराभवाला राहुल गांधी जबाबदार नाहीत असा निर्वाळा दिला आहे.
आता ऍँटनी कोण आहेत आणि राहुल गांधी कोण आहेत हे आपल्याला माहीत आहे. मग त्यांचे नाते मालक आणि नोकरासारखे असेल तर अँटनी समिती कोणत्याही स्थितीत राहुल गांधी यांना क्लीन चिटच देणार हे अगदी उघड आहे. किंबहुना आपल्याला हाच निष्कर्ष काढायचा आहे असे ठरवूनच अँटनी यांनी चौकशी केलेली आहे.
आधी निष्कर्ष आणि नंतर चौकशी कारण मुळात या समितीचा घाटच मुळी राहुल गांधी यांना निर्दोष ठरवण्या साठी घातला गेला आहे. असे असेल तर निष्कर्ष दुसरा कसा निघेल ? हा अहवाल प्रसिद्ध होताच आधी उत्तर प्रदेशातल्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आपण अँटनी समितीला जे काही सांगितले होते ते या समितीच्या अहवालात आलेच नाही अशी तक्रार त्यांनी केली. अँटनी यांना हिंदी येत नसल्याने त्यांना आपण काय सांगतोय ते कळलेच नसावे असे या कार्यकर्त्यांनी म्हटले. असे घडले असणे शक्य आहे. त्याला अजून एक कारण आहे.
अनेक कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातल्या पराभवाला त्यांची कार्यपद्धतीच कारणीभूत असल्याचे स्पष्टच सांगितले होते. हा अहवाल प्रसिद्ध होण्याच्या तीन दिवस आधी राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशाचा दौरा केला. या दौर्यात त्यांनी आपल्या लोकसभेच्या मतदारसंघातल्या मतदारांच्या भेटी घेतल्या. या भेटीत अनेक मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना फैलावर घेतले.
एका कार्यकर्त्याने तर राहुल गांधी यांनी त्यांची कार्यपद्धती न बदलल्यास त्यांना कसलेही राजकीय भवितव्य नाही असे त्यांच्या समक्ष बजावले. या देशात गांधी घराण्याचा दबदबा आहे. पण त्यांना राजकारणात एकमागे एक पराभव पत्करावे लागत असतील आणि त्यांना जनतेत स्थान नाही हे वारंवार स्पष्टपणे दिसत असेल तर कार्यकर्ते त्यांना फार दिवस दबून राहणार नाहीत. आता तसाच प‘कार घडत आहे.
अँटनी यांनी आपल्या अहवालात राहुल गांधी यांना कितीही सांभाळून घेतले असले तरीही कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांची किंमत कळून चुकली आहे. त्यामुळे त्यांचा अमेथीचा दौरा त्यांना आत्मसाक्षात्कार घडवणारा ठरला आहे. कार्यकर्त्यांनी त्यांची धोरणे गरिबांच्या ऐवजी श्रीमंतांचे हित साधणारे असते अशी समज दिली.
अशा प्रसंगी पुढार्यांची जनतेसमोर नम्रपणे वागण्याची एक खास शैली असते. ते अशी तक्रार करणारांना सर्वांसमक्ष फार गोड बोलतात. आपण सर्वांच्या समस्या समजून घेणार आहोत आणि त्या जरूर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत असे ते बैठकीत बोलून वेळ मारून नेतात. पण या कार्यकर्त्यांना ही बनवा बनवी माहीत झाली आहे. त्यांनी राजीव गांधी यांना या बैठकीत याही विषयी सरळ सरळ झापले आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याची त्यांना तळमळ कशी नाही हे त्यांनाच समजून दिले. कॉंग्रेसच्या कोणा नेत्याला एवढे पक्षातले आहेर क्वचितच मिळाले असतील.
एवढ्यावरही ते सुधारणार नाहीत कारण सुधारण्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते करणे त्यांना परवडणारे नाही. सुधारणे म्हणजे आयत्या रक्ताच्या वारशाने चालत आलेली पदे सोडणे. ते काही केले जाणार नाही आणि कॉंग्रेसचा पराभव टळणार नाही.